Hanuman Jayanti 2020: हनुमान जयंती साजरी करण्याचे महत्व काय? जाणुन घ्या बजरंगबलीची जन्मकथा आणि यंदाचा मुहुर्त
यानुसार यंदा 8 एप्रिल रोजी हनुमान जयंतीचा (Hanuman Jayanti 2020) सोहळा साजरा केला जाणार आहे. हनुमानाची जन्मकथा आणि यंदाच्या पूजनाचा मुहूर्त जाणून घेऊयात..
रामभक्त, पवन पुत्र, शक्तीची देवता म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाचा दरवर्षी चैत्र पौर्णिमेला जन्मसोहळा पार पडतो. यानुसार यंदा 8 एप्रिल रोजी हनुमान जयंतीचा (Hanuman Jayanti 2020) सोहळा साजरा केला जाणार आहे. रामायणात (Ramayan) राम, सीता, रावण यांच्या इतकंच गाजलेलं नाव म्हणजे हनुमान, मर्कटाचा चेहरा, वाऱ्याचा वेग, आणि हत्तीचे बळ असे बजरंगबलीचे स्वरूप आपण सर्वजण जाणून आहोत. बालवयापासूनच हनुमाने अनेक किस्से केले आहेत, यातील फळ समजून सूर्याला पकडायला झेप घेणे, केळीची बाग फस्त करणे, या कथा तर आजही लहानमुलांना आवर्जून सांगितल्या जातात. तर रावणाने सीतेचे हरण केल्यावर तिला शोधायला जाणारा हनुमान, रागाने लंका जाळण्याचा प्रसंग, रामाला लंकेपर्यंत नेणारा सेतू बांधण्याचा प्रसंग यामधून बजरंगबलीच्या ताकदीचा अंदाज लावता येतो. अशा या हनुमाच्या जयंती निमित्त देशात दरवर्षी मोठा सोहळा साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा जरी होणार नसला तरी प्रत्येकजण आपापल्या घरात हनुमाचे पूजन करूच शकतो. तत्पूर्वी या लेखातून हनुमानाची जन्मकथा आणि यंदाच्या पूजनाचा मुहूर्त जाणून घेऊयात..
हनुमानाची जन्मकथा
हनुमान हा अंजनी आणि केसरीचा पुत्र आहे. त्याला भगवान शिव यांचा 11 वा अवतारदेखील मानला जातो. हनुमानाच्या जन्माबद्दल अनेक पौराणिक कथा आहेत. अमरत्वाच्या प्राप्तीसाठी जेव्हा देव आणि राक्षसांमध्ये युद्ध पेटलं तेव्हा समुद्रमंथनातून अमृत असूरांनी पळवलं. त्यावेळेस भागवान शिवाने वीर्य त्याग केला आणि पवनदेव (वायुदेवता) वानरराज केसरी यांचा पत्नी अंजना यांच्या गर्भामध्ये प्रवेश झाला. त्यामधून अंजनाने हनुमानाला जन्म दिला. हा दिवस चैत्र पौर्णिमेचा असल्याने या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते.
तर वाल्मिकी रामायणानुसार, राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी ‘पुत्रकामेष्टी यज्ञ’ केला. तेव्हा यज्ञातून अग्निदेव प्रगट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस (खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) प्रदान केला होता. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्या अंजनीलाही पायस मिळाले होते आणि त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता असे मानले जाते.
हनुमान जयंती शुभ मुहूर्त
चैत्र पौर्णिमा प्रारंभ- 7 एप्रिल रात्री 12 वाजून 1 मिनिट
चैत्र पौर्णिमा समाप्ती- 8 एप्रिल सकाळी 8 वाजून 1 मिनिट
हनुमान जयंती दिवशी यंदा घराबाहेर पडू नका. घरीच हनुमानाची मूर्ती असेल तर त्यावर तेलाचा अभिषेक करून रूईची फूलं आणि वडाच्या पानाचा हार अर्पण करा. हनुमान चालीसा पठण करून धूप दाखवून, शुद्ध तुपाचा नैवैद्य दाखवा.