Ghatasthapana 2022 Shubh Muhurat: घटस्थापना कशी करावी? पूजा विधी आणि शुभ मुहूर्त, जाणून घ्या
Ghatasthapana 2022 Puja Vidhi (Photo Credits: Instagram)

Ghatasthapana 2022 Puja Vidhi: यंदा 26 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे.  ९ दिवस हा उत्सव सोहळा रंगणार आहे. भारतात साजरा केल्या जाणाऱ्या या ९ दिवसाच्या उत्सवात देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरु होणाऱ्या या उत्सवाची सांगता दसऱ्याने होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते. काही सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्येही घट बसवतात तर काही ठिकाणी देवीची सुंदर मुर्तीही बसवली जाते. मागील 2 वर्षांपासून कोरोनामुळे सध्या पद्धतीने उत्सव साजरे केले जात होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व निर्बंध उठवल्यानंतर उत्साह द्विगुणीत झाला आहे. यंदा गणेशोत्सवाचा सणही थाटात साजरा करण्यात आला आहे. आता अनेकांना उत्सुकता लागली आहे. नवरात्रीची, घरातील घटस्थापना असो किंवा दांडिया, तरुणाई सज्ज झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, घरोघरी घटस्थापना करुन वर्षानुवर्षांची चालत आलेली परंपरा जपली जाईल आणि याही वर्षी अनेकांच्या घरी घट बसवले जातील. परंतु घट स्थापन करण्याची विधी असते तर  घटस्थापना नेमकी कशी करावी? त्यासाठी शुभ वेळ, पूजा विधी काय? याबद्दल जाणून घेऊया...[हे देखील वाचा : Navratri Colours 2022 for 9 Days: 26 सप्टेंबरला घटस्थापनेपासून 4 ऑक्टोबर पर्यंत नऊ रात्रींचे नऊ रंग कोणते?]

घटस्थापना शुभ मुहुर्त (Ghatasthapana 2022 Shubh Muhurat):

यंदा सोमवार, 26 सप्टेंबरला घटस्थापना केली जाईल. या दिवसापासून शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होईल. 

घटस्थापना मुहूर्त - सकाळी 06:11 ते 07:51 पर्यंत. 

घटस्थापना अभिजित मुहूर्त - सकाळी ११:४८ ते दुपारी १२:३६

घटस्थापना पूजा विधी (Ghatasthapana 2022 Shubh Muhurat):

  •  घटस्थापना करताना घट पाटावर किंवा चौरंगावर मांडला जातो. त्यामुळे चौरंग किंवा पाटा खाली रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू घाला.
  •  चौरंग/पाटावर लाल वस्त्र अंथरा.
  • टोपली किंवा पराती मध्ये माती घालून त्यात मिश्र धान्य पेरा. त्या मधोमध कलश ठेवा.
  •  कलश तयार करताना त्यात हळद-कुंकू, सुपारी, अक्षता, दुर्वा, सव्वा रूपया घाला. कलशाला हळदी कुंकुवाच्या प्रत्येकी 5 बोटं ओढा. कलशामध्ये नागवेलीची किंवा पाच प्रकारच्या पाच विविध पानांच्या मध्ये नारळ ठेवून सजवा.
  •  कलश परातीत किंवा टोपल्यात ठेवून ते चौरंगावर ठेवा.
  •  नारळावर बारीक काडी लावून त्यावर फुलं ठेवा.
  •  कलशाला हळद कुंकु, गंध अक्षता वाहून पूजा करा.
  •  कलशावर तुम्ही चुनरी देखील चढवू शकता. वेणी, गजरा घाला.
  •  दिवा-अगरबत्ती ओवाळा. दोन्ही बाजूला तुम्ही समया देखील लावू शकता.
  •  नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी एक अशी फुलांची माळ वाढवत जा.
  •  दर दिवशी सकाळ-संध्याकाळ आरती करून पूजा करा.
  •  परातीत/ टोपल्यात पेरलेल्या धान्यावर दिवसातून दोनदा थोडे थोडे पाणी घाला. नऊ दिवसांत ही धान्य छान वाढतात. त्याच्या वाढीनुसार आपल्या घराण्याची भरभराट होते, असे मानले जाते.

नवरात्रातीत दुर्गेची पूजा ही "निर्मिती शक्तीची" पूजा असते. नवरात्रीतील घटाला सृष्टीचे रुप मानले जाते. या काळात कन्या पूजन करुन देवीच्या रुपाची पूजा केली जाते.