गटारी, दीप अमावस्या की आषाढ अमावस्या: श्रावण महिना सुरू होण्याआधीचा दिवस नेमका काय?
महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरूवात 13 ऑगस्ट दिवशी होणार आहे. 12 ऑगस्टच्या रात्री 11 वाजून 06 मिनिटांनी अमावस्या संपणार आहे. हा श्रावण महिना 11 सप्टेंबर पर्यंत आहे.
हिंदू धर्मियांसाठी श्रावण महिना (Sharavan Month) हा अत्यंत पवित्र महिना असतो. मराठी कॅलेंडरमधील या पाचव्या महिन्यात आपसूकच सर्वत्र आनंदाचं,चैतन्याचं वातावरण असतं.सण आणि व्रत वैकल्यांची रेलचेल असल्याने या महिन्यात अनेक उपवास असतात. त्यामुळे श्रावणापूर्वीच मांसाहारावर ताव मारून त्याचा आनंद घेतला जातो. सोशल मीडीयात दरवर्षी श्रावण महिना सुरू होण्याआधीच्या अमावस्येला नेमकं गटारी (Gatari), दीप अमावस्या (Deep Amavasya) की आषाढ अमावस्या (Ashadha Amavasya) म्हणावं यावरून चर्चा रंगत असतात. मग आज हा संभ्रम कायमचा दूर करण्यासाठी नेमकी गटारी अमावस्या, दीप अमावस्या आणि आषाढ अमावस्या असते काय?
गटारी अमावस्या, दीप अमावस्या आणि आषाढ अमावस्या
गटारी अमावस्या, दीप अमावस्या आणि आषाढ अमावस्या हे काही तीन वेगवेगळे दिवस नसून एकाच दिवसाच्या तीन वेगवेगळ्या ओळखी आहेत.आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणारी अमावस्या ही एकच तिथी आहे. फक्त तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि तिला दिलं जाणारं नाव वेगवेगळ्या कारणांमुळे बदलतं. नक्की वाचा: Shravan Masarambh 2026: यंदा श्रावण महिन्याची सुरूवात कधी? जाणून घ्या श्रावणी सोमवार, मंगळागौर सह महत्त्वाच्या सणाच्या तारखा .
आषाढी अमावस्या
आषाढ महिन्याची सांगता आषाढी अमावस्या या दिवसाने होते. हे या तिथीचं पंचांगातील नाव आहे. महाराष्ट्रात महिन्याची सांगता अमावस्या आणि सुरूवात दुसऱ्या दिवसापासून शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून होते. त्यामुळे यंदा आषाढी अमावस्या 12 ऑगस्टला आहे. 12 ऑगस्टच्या रात्री 11 वाजून 6 मिनिटांनी अमावस्या संपणार आहे.
दीप अमावस्या
आषाढी अमावस्याच दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते. आषाढ हा पावसाळ्यातील महिना त्यात अमावस्या म्हणजे काळोखी वातावरण असते. पूर्वी या अंध:काराला दूर करण्यासाठी श्रावणाआधीच्या दिवशी घरातील सारे दिवे स्वच्छ करून ते प्रज्वलित करण्याची रीत होती. त्यामुळेच त्याला दीप अमावस्या म्हटले जाते.
गटारी अमावस्या
गटारी अमावस्या याबद्दल मतभेद आहेत. खरंतर त्याचा धार्मिक, सांस्कृतिक गोष्टींशी संबंध नाही. श्रावण महिना आणि त्यासोबत सुरू असलेला चातुर्मास यामध्ये मांसाहार न करण्याची पद्धत असल्याने श्रावणाआधी मनसोक्त मांसाहारावर ताव मारणे या उद्देशाने गटारी साजरी करण्यात येत. कुटुंब, मित्र परिवार एकत्र येतो. मांसाहारी पदार्थांची मेजवानी करत मज्जामस्ती करण्याचा हा दिवस असतो. गटारी साजरी करण्यासाठी विशिष्ट दिवसाची गरज नसते. श्रावण सुरू होण्याआधी तुमच्या सोयीनुसार रविवारी किंवा मांसाहार करण्याच्या दिवशी गटारी साजरी केली जाते.
महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरूवात कधी?
महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरूवात 13 ऑगस्ट दिवशी होणार आहे. 12 ऑगस्टच्या रात्री 11 वाजून 06 मिनिटांनी अमावस्या संपणार आहे. हा श्रावण महिना 11 सप्टेंबर पर्यंत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2026 11:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

