Ganeshotsav At Kashmir Valley: यंदा काश्मीर खोऱ्यात तीन ठिकाणी साजरा केला जाणार गणेशोत्सव; पुण्यातील मानाच्या गणपतींच्या प्रतिकृती होणार स्थापन

तीन मानाच्या गणपतींच्या मूर्ती- तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम आणि तुळशीबाग, काश्मीरमधील तीन मंडळांना सुपूर्द केल्या जातील.

Ganpati | Representational image (Photo Credits: pxhere)

Ganeshotsav At Kashmir Valley: काश्मीर खोऱ्यात (Kashmir Valley) सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा केला जाणार आहे. या वर्षी इथे तीन ठिकाणी उत्सव साजरा होईल. पुण्यात (Pune) असलेल्या मानाच्या गणेशमूर्तींच्या (Manache Ganpati) प्रतिकृती शनिवारी (31 ऑगस्ट) तीन मंडळांना सुपूर्द केल्या जाणार आहेत. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे प्रमुख आणि विश्वस्त पुनित बालन यांनी गुरुवारी ही माहिती दिली. पाच मानाच्या गणपतीमध्ये कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा यांचा समावेश आहे.

19व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यात सुरू झालेला हा सार्वजनिक उत्सव आता परदेशातही पोहोचला आहे. जगभरात अनेक ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. मात्र, भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मीर खोऱ्यात गेल्या 34 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा झाला नव्हता, आता तो पुन्हा साजरा होत आहे.

काश्मीरमध्ये गेल्या वर्षीपासून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बालन यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर पुण्यातील सात प्रमुख गणेश मंडळांनी- मानाचे 5 गणपती आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि अखिल मंडई मंडळ यांनी या दिशेने सामूहिक पाऊल टाकले आणि गेल्या वर्षी श्रीनगरच्या लाल चौकातील गणपतीर मंदिरात दीड दिवस गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. लाल चौकात प्रथमच पहिल्या मानाचा गणपती कसबा गणपतीची मूर्ती बसवण्यात आली. (हेही वाचा: Gauri Pujan 2024 Ukhane: गौरी गणपती पुजननिमित्त घेता येतील अशा हटके उखाण्यांची यादी, येथे पाहा)

यावर्षी कुपवाडा आणि अनंतनागमध्येही पाच दिवसांचा उत्सव साजरा केला जाणार आहे. तीन मानाच्या गणपतींच्या मूर्ती- तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम आणि तुळशीबाग, काश्मीरमधील तीन मंडळांना सुपूर्द केल्या जातील. शनिवारी मूर्ती सोपविण्याचा कार्यक्रम होणार असल्याचे पुनित बालन यांनी सांगितले. गेल्या वर्षी काश्मीरमध्ये 34 वर्षांनंतर गणपती उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली.