Eid-E-Milad-Un-Nabi 2019: ‘ईद-ए-मिलाद' यंदा 10 नोव्हेंबरला; जाणून या ईदचा इतिहास, महत्त्व आणि परंपरा
हा सण मुस्लिम बांधवांच्या अनेक मोठ्या सणांपैकी एक मानला जातो. मुस्लिम बांधव पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाचा आनंद म्हणून हा सण साजरा करतात.
Eid-E-Milad-Un-Nabi 2019: आज (10 नोव्हेंबर) संपूर्ण देशभरात ‘ईद-ए-मिलाद-उन-नबी' (Eid-E-Milad-Un-Nabi) हा मुस्लिम बांधवाचा सण उत्साहात साजरा होत आहे. हा सण मुस्लिम बांधवांच्या अनेक मोठ्या सणांपैकी एक मानला जातो. मुस्लिम बांधव पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाचा आनंद म्हणून हा सण साजरा करतात. 12 रबी उल अव्वल या दिवशी मुस्लिम धर्मियांचे पवित्रस्थळ मक्का (Makka) येथे मोहम्मद यांचा जन्म झाला होता. हा दिवस मुस्लिम समुदायाकडून मोठ्या उत्साहात ईद मिलाद उन नबी (Eid-e-Milad Un Nabi) च्या रूपात साजरा केला जातो.
'ईद' या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. या दिवशी अन्नाच्या स्वरुपात दान केले जाते. इस्लाम धर्मानुसार, पैगंबर हजरत मोहम्मद हे शेवटचे संदेशवाहक आणि सर्वात महान संदेष्टे मानले जातात. ज्यांना खुद्द अल्लाहने देवदूत जिब्रईलद्वारा कुराणचा संदेश दिला होता. पैगंबर हजरत मोहम्मद यांनी नेहमी शांततेचा संदेश दिला. त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. ईद-ए-मिलाद सणाविषयी या समाजात वेगवेगळी मते आहेत. 'शिया' आणि 'सुन्नी' यांची या दिवसाबद्दल स्वत:ची अशी मते आहेत.
ईदच्या दिवशी नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात. ईद-ए-मिलाद या दिवशी मुस्लिम बांधव पैगंबर मोहम्मद यांच्या प्रतीकात्मक पावलांची पूजा करतात. या दिवशी पैगंबराच्या मोठमोठ्या मिरवणुकाही काढल्या जातात.
या दिवशी इस्लामचा सर्वात पवित्र ग्रंथ कुराणाचेही वाचण केले जाते. तसेच लोक या दिवशी मक्का-मदिनाला जातात. या दिवशी सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातील महिलावर्गात मोठा उत्साह असतो. या दिवशी मुस्लिम बांधव आपल्या घराला सजवून मित्रपरिवाराला आपल्याकडे शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित करतात. या दिवशी सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते.