Dr Babasaheb Ambedkar's 130th Birth Anniversary: घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन; चैत्यभूमी येथील स्मारकस्थळावरून होणार थेट प्रक्षेपण
बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकस्थळावरून थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शन घेण्याची सुविधा तसेच बीआयटी चाळ आणि इंदूमिल या ठिकाणच्या कार्यक्रमांसाठी सुविधा याबाबतही सूचना करण्यात आल्या
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती (Dr Babasaheb Ambedkar's 130th Birth Anniversary) कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ई-बैठक पार पडली. सध्याची राज्यातील कोरोना विषाणूची परिस्थिती पाहता जयंती समन्वय समिती ब्रेक द चेन (Break The Chain) व त्या अनुषंगाने राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांना पाठींबा दर्शवत आहे. बैठकीत जयंती समन्वय समितीच्या वतीने 14 एप्रिल या जयंतीदिनी कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमावलीचे पालन करून कार्यक्रमांचे आय़ोजन केले जाईल, असे सांगण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पूर्ण सन्मानाने साजरा केली जावी. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरा-घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचे पालन केले जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
चैत्यभूमी स्मारक तसेच मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी गर्दी न करता अभिवादन केले जाईल आणि राज्यभरातील अनुयायांनाही जयंती साजरी करण्याच्या शासन परिपत्रकातील नियमावलींचे पालन करून साधेपणाने जयंती साजरे करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे समन्वय समितीने सांगितले. डॉ. आंबेडकर यांचे इंदूमिल स्थित स्मारकाच्या पुतळ्याची उंची आणि अनुषंगिक गोष्टींना गती दिल्याचे सांगून, मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, गर्दी न करता विविध समाजोपयोगी उपक्रमांनी बाबासाहेबांची जयंती साजरी करता येईल. (हेही वाचा: Raj Thackeray यांचा परप्रांतीयांवर पुन्हा हल्लाबोल; महाराष्ट्रातील कोरोना आकडा वाढवण्याचं सांगितलं 'हे' एक कारण!)
जंयतीदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकस्थळावरून थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शन घेण्याची सुविधा तसेच बीआयटी चाळ आणि इंदूमिल या ठिकाणच्या कार्यक्रमांसाठी सुविधा याबाबतही सूचना करण्यात आल्या. त्याबाबत कार्यवाहीचे निर्देशही यावेळी संबंधित यंत्रणांना देण्यात आले.