Diwali Ank : दिवाळी अंक इतिहास, महाराष्ट्राची वाचन संस्कृती, परंपरा आणि भविष्य
महाराष्ट्रात दिवाळी सणाचा एक वेगळाच पैलू पुढे येतो. ज्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अत्यंत मानाचे स्थान आहे. हा पैलू म्हणजे दिवाळी अंक. दिवाळीच्या फराळासोबत जर दिवाळी अंक नसेल तर, त्या वर्षीची दिवाळी काहीशी सुनी सुनी गेली असे वाटते.
महाराष्ट्रासह संपूर्ण भारत आणि जगभरातील काही ठिकाणी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होते. प्रत्येक सण, उत्सवावर त्या त्या प्रदेशातील सांस्कृतीक प्रथा, परंपरांचा प्रभाव असतो. पण, महाराष्ट्रात दिवाळी सणाचा एक वेगळाच पैलू पुढे येतो. ज्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अत्यंत मानाचे स्थान आहे. हा पैलू म्हणजे दिवाळी अंक. दिवाळीच्या फराळासोबत जर दिवाळी अंक नसेल तर, त्या वर्षीची दिवाळी काहीशी सुनी सुनी गेली असे वाटते. म्हणूनच भारतीय छापाईच्या इतिहासात वाचन परंपरेचा एक मोठा आयाम दिवाळी अंकांनी व्यापला आहे. जो केवळ मराठी भाषेतच पहायला मिळतो. अर्थात, बंगाली, गुजराती भाषेतही दिवाळी अंक छापले जातात. पण, त्याचे प्रमाण अगदीच अल्प आहे. दिवाळीसारख्या उत्साहाच्या सणानिमित्त दिवाळी अंकाच्या इतिहास आणि परंपरेवर टाकलेला हा एक अलपसा कटाक्ष....
दिवाळी अंकाची सुरुवातच मुळात साहित्यिक प्रेरणेतून झाली. कथा, कविता, लेख, नाटक आदी विषयांवर भाष्य करणारा एक अंक १९०५मध्ये दिवाळीच्या कालावधीत निघाला. बाळकृष्ण विष्णू भागवत यांच्या 'मित्रोदय' मासिकाने 'नोव्हेंबर दिवाळीप्रीत्यर्थ' असा उल्लेख करुन काढलेला हा अंक. या मासिक अंकापासूनच दिवाळी अंकाच्या परंपरेला सुरुवात झाली असे सांगतात. मराठी साहित्यात त्याही काळी मासिके, साप्ताहिके निघत असत. पण, खास दिवाळीप्रीत्यर्थ निघालेला हा पहिलाच अंक. अंकातील संपूर्ण मजकूर साहित्याला वाहिलेला. अवघा २४ पानांचा हा अंक. आजच्या काळात ही पृष्ठसंख्या अगदीच नगन्य. पण, त्या काळात ती बरीच मोठी समजली जायची. या २४ पानांच्या अंकातही कादंबरी, चरित्र, वैचारिक निबंध असा भरगच्च मजकूर देण्यात आला होता. त्यातही या अंकाचे वैशिष्ट्य असे की, अंकातील २४ पैकी १६ पानं मराठी आणि ८ पानं इंग्रीज मजकूरासाठी होती. मराठी लेखक, प्रकाशक आणि रसिकांची खरी साहित्यिक दिवाळी या अंकापासूनच सुरु झाली. पण, खऱ्या अर्थाने दिवाळी अंकाचा मान हा काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी संपादित केलेल्य १९०९ साली प्रकाशित 'मनोरंजन' दिवाळी अंकास जातो. कारण, मनोरंजनने पूर्णपणे दिवाळीसाठी मराठीतील पहिला दिवाळी अंक काढला होता. का. र. मित्र हे इ.स. १८८५ पासून 'मनोरंजन' हे मासिक चालवत होते.
जसजसा काळ पुढे जाऊ लागला तसतशी महाराष्ट्रातील मराठी मनाची साहित्यिक, सांस्कृती भूक वाढत होती. या वाढत्या भुकेला मराठी प्रकाशक साप्ताहिके, मासिके, पुस्तके आणि दैनंदिन घडामोडींसाठी वृत्तपत्रे जमेल तसे खाद्य देत होती. आजही देतात. पण, दिवाळी अंकानी हे खाद्य अधिक सकसपणे द्यायला सुरुवात केली. दिवाळीची सुट्टी आणि आनंदाचे वातावरण सर्व आप्तेष्टांची भेट यामुळे वैचारिक देवाणघेवाण होत असे. यात दिवाळी अंक मोलाची भूमिका बजावत. पुढे पुढे शिक्षण, पर्यटन, आर्थिक साक्षरता आणि प्रवास यामुळे वाचकांची भूक आणखी वाढली. ते पाहून साप्ताहिकांनी विषयनिवडीत पहिल्यांदा कात टाकली. त्याचे पडसाद दिवाळी अंकातही उमटले. कथा, कविता, नाटक, कादंबरी यांसोबतच इतर भाषांमधील लेखकांचे साहित्य, भाषांतरीत कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकं दिवाळी अंकात छापून येऊ लागली. आज तर दिवाळी अंकांचे स्वरुप इतके बदलले आहे की, विविध विषय घेऊन प्रकाशक दिवाळी अंक काढतात. जसे की, पर्यटन, राजकारण, ललित, समिक्षा, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय संबंध वैगेरे वैगेरे. (हेही वाचा, Diwali 2018 : दिवाळी सण, वसुबारस आणि गाईची पूजा)
दरम्यान, आजचे युग हे डिजिटल युग आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे डिजिटल युगाने जगभरातील मुद्रीत (छापाई) व्यवसाय धोक्यात आणला आहे. याचा फटका भारतातील मुद्रित माध्यमांनाही (वृत्तपत्रे, साप्ताहिके) बसतो आहे. त्यामुळे परिणाम दिवाळी अंकांवर दिसले नाही तरच नवल. अनेक लोकप्रिय मासिके, संस्था आणि व्यक्तिंचे अंक प्रकाशित होणे बंद झाले आहे. बंद होण्याच्या मार्गावर आहे. ज्यांचे अंक प्रकाशित होतात त्यांची चिकाटी आणि व्यावसायिक तडजोड मोठी कष्टप्रद आहे. त्यामुळे दर्जेदार दिवाळी अंकांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे.
अर्थात, दरवर्षी दिवाळी अंकांची संख्यात्मक संख्या वाढत असल्याचे दाखले दिले जातात. दावे होतात. त्यात तथ्यही आहे. शहरांपासून ग्रामिण भागापर्यंत अनेक दिवाळी अंक निघतात. पण, त्यातही एक बाजारुपणा आला आहे हे नाकारता येणार नाही. केवळ जाहिरातींतून मिळणाऱ्या उत्पन्नावर डोळा ठेऊनही काही मंडळी अंकाची निर्मिती करतात. पण, त्यातून वाचकाला सकस असे काही मिळत नाही. दुसऱ्या बाजूला सकस साहित्य देणाऱ्या दिवाळी अंकाला वाचक भेट नाही, असेही त्रांगडे पाहायाल मिळते. पण, यात काही चांगल्या प्रकाशनसंस्था, व्यक्ती, समुहांनी काळाची पावले ओळखत डिजिटल दिवाळी अंक काढायलाही सुरुवात केली आहे. डिजिटल दिवाळी अंक हे तुलनेत कमी खर्चात तयार होतात. त्यामुळे काळानुसार बदलल्यास डिजिटल दिवाळी अंकांच्या माध्यमातूनही वाचकाला साहित्यिक दिवाळीचा आनंद घेता येऊ शकेल. पण, हे सर्व बदलाची तयारी ठवली तरच होऊ शकते. अन्यथा...
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)