महाराष्ट्रातील देवीची असलेली साडे तीन शक्तिपीठं

आपल्या महाराष्ट्रात देवीची साढे तीन शक्तिपीठे आहेत. त्यात महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाणारी तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाई, माहूरची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी आहेत.

महाराष्ट्रातली साढे तीन शक्तिपीठं | File Image

आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आदरातिथ्य केल्यानंतर देवीच्या आगमनाची चाहूल लागते. पितृ पंधरवडा संपल्यानंतर नवरात्रोत्सवाला सुरवात होते आणि याच  काळात देवीची आराधना केली जाते. हिंदू धर्मात देवीची १०८ शक्तिपीठे आहेत असं मानलं जातं. आपल्या महाराष्ट्रात देवीची साडे तीन शक्तिपीठे आहेत. त्यात महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाणारी तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाई, माहूरची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी आहेत. चला जाणून घेऊया ह्या देवींची माहिती.

१. तुळजापूरची आई भवानी:

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजापूरची आई भवानी प्रसिद्ध आहे. भवानी ही  छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत आहे. असं मानलं जातं की  स्वराज्याच्या स्थापनेसाठी भवानीने महाराजांना तिची तलवार आशीर्वाद म्हणून दिली. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर शहरात आई भवानीचं मंदिर आहे. मंदिराची बांधणीही हेमाडपंती असून बांधकाम प्राचीन आहे. महिषासुर राक्षसाचा वध केल्यावर भवानी तुळजापूर येथे स्थायिक झाली अशी आख्यायिका आहे. वर्षभर देवीच्या दर्शनाला खूप गर्दी असते. इथे भाविक देवीचा जागर आणि गोंधळ सुद्धा करतात. नवरात्रात देवीचा उत्सव हा एकवीस दिवस चालतो.

 

२. कोल्हापूरची अंबाबाई:

पद्मपुराण, स्कंदपुराण, देवी भागवत ह्या प्राचीन पुराणात महालक्ष्मी देवीचा उल्लेख आढळतो. हे मंदिर इ.स. ६०० ते ७०० ह्या काळात बांधलं गेल्याची शक्यता आहे. मुघल आक्रमणावेळी मंदिर उध्वस्त झालं होतं त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. असं मानलं जातं कि महर्षी भृगुह्यांनी श्री विष्णूंचा अपमान केल्यावर देवी लक्ष्मीही भगवंतांवर रागावून करवीर नगरीत आली. तिला राहण्यासाठी घर नसल्यामुळे तिच्या सेवकांनी म्हणजेच काही दैत्यांनी तिच्यासाठी हे मंदिर बांधले. कोल्हापूरची अंबाबाई लक्ष्मीचं रूप आहे कि दुर्गेचं हा वाद काही समाजांमध्ये आहे. सूर्याची किरणे सुर्यास्थाच्या वेळी वर्षातून तीन वेळा देवीच्या पायावर पडतात. हे अदभूत रूप पाहण्यासाठी लाखो भाविक कोल्हापुरात गर्दी करतात.

३. माहूरची रेणुका:

भगवान परशुरामाची माता म्हणून रेणुका माता प्रसिद्ध आहे. माहूर गडावरच श्री दत्तांचा जन्म झाला असं मानलं जातं. देवगिरीच्या यादव राजांनी देवीचं मंदिर १३ व्या शतकात बांधल्याचं समजतं. असं मानलं जातं कि रेणुका मातेचं लग्न हे जमदग्नि ऋषींसोबत झालं होतं आणि त्यांच्याकडे कामधेनू गाय होती. आपल्या पित्याच्या सांगण्यानुसार परशुरामांनी आईचा वध केला पण त्यानंतर त्यांना खूप दुःख झालं. तेव्हा जमदग्नी ऋषींनी परशुरामाला सांगितलं कि तुझी आई पुन्हा जिवंत होईल पण तू मागे वळून नाही बघायचं. पण परशुरामाला मोह आवरला नाही आणि त्यांनी मागे बघितले. तेव्हा रेणुका मातेचं अर्ध शरीर बाहेर आलं होतं. अशा अर्ध्या रूपात रेणुका मातेचं हे स्थान आहे.

 

४. वणीची सप्तशृंगी:

वणीची सप्तशृंगीही साडे तीन शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ आहे. महाकाली, महालक्ष्मी आणि सरस्वतीचं एक रूप म्हणजे सप्तशृंगी असं मानलं जातं. महिषासुर राक्षसाबरोबर युद्ध करण्यासाठी देवीने अष्टभुजा रूप घेतलं आणि सर्व देवांनी तिला अस्त्रे दिली अशी आख्यायिका आहे. हेच ते देवीचं रूप. देवीचे डोळे हे टपोरे असून मूर्ती शेंदूर अर्चित आहे.