Boss Day 2019: चिडलेल्या बॉसला शांत करण्यासाठी महत्वाचे उपाय; 'या' गोष्टींनी काढू शकता समजूत

काही प्रमाणात तुम्हाला ओरडाही खावा लागतो. आता बॉस रागावण्यामुळे केवळ कामावर परिणाम होणार नाही, तर थोडाफार तणावही वाढतो

Happy Boss Day (File Image)

16 ऑक्टोबर म्हणजेच आजचा दिवस जगभरात ‘बॉस डे’ (Boss Day) म्हणून साजरा केला जातो. ऑफिसमध्ये आपल्या कामाने बॉस खुश राहणे हे तितकेच महत्वाचे आहे, तितके घरात बायको खुश राहणे. हे दोघे खुश तर आपेल आयुष्य खुश. परंतु बर्‍याच वेळा काही छोट्या-मोठ्या चुकांमुळे तुमचा बॉस तुमच्यावर चिडतो. काही प्रमाणात तुम्हाला ओरडाही खावा लागतो. आता बॉस रागावण्यामुळे केवळ कामावर परिणाम होणार नाही, तर थोडाफार तणावही वाढतो. छोट्या छोट्या गोष्टींवर चीड चीड होते. मात्र आता तुमचा बॉस तुमच्यावर रागावला असेल तर, जास्त विचार करण्याची गरज नाही. आम्ही आजच्या ‘बॉस डे’च्या निमित्ताने आपल्याला काही टिप्स देत आहोत, ज्याच्या मदतीने आपण आपल्या संतप्त किंवा चिडलेल्या बॉसची ताबडतोब समजूत काढू शकता.

बॉसचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका -

बर्‍याच वेळा जेव्हा बॉस तुमच्यावर चिडतो, तेव्हा तुम्हीसुद्धा रागावता. काहीवेळा उलट उत्तरेही देता. परंतु बॉसची विचारसरणी आणि अनुभव पाहता स्वतःला वाईट वाटून घेऊ नका. बॉसच्या विचारांचा आदर करा. अशावेळी शांत राहून बॉस काय म्हणत आहे ते काळजीपूर्वक ऐका, फक्त योग्य वेळी योग्य गोष्टी बोला. असे केल्याने, आपल्या बॉसचा राग शांत होईल आणि तो घडलेली गोष्टही विसरून जाईल.

फुलांचा गुच्छ भेट म्हणून द्या –

फुल ही एक गोष्ट आहे जी आपण कधीही कोणालाही भेट म्हणून देऊ शकता. अशा भेटीने प्रत्येकजणच खुश होते. आपणही आपल्या संतप्त बॉसला पुष्पगुच्छ भेट देऊ शकता. यामुळे त्याची नाराजी दूर होण्यास काही प्रमाणात मदत होईल. आपण पुष्पगुच्छांसह ‘सॉरी कार्ड’ देखील देऊ शकता.

वाद न घालता शांत राहा -

बर्‍याच वेळा आपल्याला आपण आपल्या जागी योग्य आहात असे वाटते, त्यामुळे बॉससोबतच्या वादविवादामध्ये शब्दाला शब्द वाढत जातो. मात्र लक्षात घ्या यामुळे परिस्थिती अजून बिघडू शकते. त्यामुळे बॉससोबत कोणताही वाढ टाळा आणि तो जेव्हा चिडलेला असेल तेव्हा तुम्ही शांत राहा. तुम्ही सतत बोलण्याऐवजी बॉसला काहीवेळ एकटे राहू द्या. यामुळे तो लवकर शांत होईल.

मतभेद होणाऱ्या गोष्टींऐवजी इतर गोष्टी बोला -

वाद संपल्यानंतरही, आपला बॉस चिडलेला असतो, अशावेळेस जुन्या गोष्टी पुन्हा उकरून काढू नका. शक्यतो नवीन गोष्टींवर बोला. काहीच नाही तर कंपनीच्या यशाबद्दल, बॉसच्या कर्तुत्वाबद्दल चार चांगल्या गोष्टी बोला, यामुळे बॉसचा राग लवकर शांत होऊ शकतो.