Ganeshotsav 2019: अष्टविनायक गणपती मंदिर, वैशिष्ट्ये आणि स्थळ; घ्या जाणून
काही ठिकाणचे बाप्पा मात्र स्वयंभू असतात. त्यामुळे त्यांच्या विसर्जनाचा प्रश्नच येत नाही. असे बाप्पा म्हणजे 'अष्टविनायक' (Ashtavinayaka). गणेशोत्सवाच्या आनंदासोबत जाणून घेऊया अष्टविनायक ( Ashtavinayaka Name) त्यांची मंदिरे आणि ठिकाणांबाबत.
Ganeshotsav 2019: उत्सवानिमीत्त प्रतिष्ठापणा केलेल्या बाप्पांचे विसर्जन करावे लागते आणि मग पुढचे काही दिवस चुकल्या चुकल्यासारखे वाटू लागते. काही ठिकाणचे बाप्पा मात्र स्वयंभू असतात. त्यामुळे त्यांच्या विसर्जनाचा प्रश्नच येत नाही. असे बाप्पा म्हणजे 'अष्टविनायक' (Ashtavinayaka). गणेशोत्सवाच्या आनंदासोबत जाणून घेऊया अष्टविनायक ( Ashtavinayaka Name) त्यांची मंदिरे आणि ठिकाणांबाबत.
मोरगांव गणपती
मोरगांवचा गणपती हा अष्टविनायक श्रृंकलेतील पहिला गणपती म्हणून ओळखला जातो. गणेश भक्तांमध्ये हा गणपती मयुरेश्वर नावानेही ओळखला जातो. मोरया गोसावी थोर गणेशभक्त होते. त्यांनी येथील गणपती पूजेचा वसा घेतला होता. सांगितले जाते की, या गणपतीच्या मंदिरातच समर्थ रामदास स्वामी यांनी 'सुखकर्ता दु:खहर्ता' ही आरती स्फुरली. श्री मोरेश्वर हे गणपतीचे स्वयंभू व आद्यस्थान आहे.
स्थळ आणि मूर्ती वैशिष्ट्य
मोरगांव गणपती मंदिर हे कऱ्हा नदीच्या तीरावर वसले आहे. मंदिरही नक्षीकामाचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते. मोरेश्वर गणपतीचे डोळे आणि बेंबीमध्ये हिरे बसवलेले पाहायला मिळतात. स्थळ - पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव येथे हे ठिकाण आहे. बारामती येथून हे अंतर 35 किलोमीटर इतके आहे. तर, महाराष्ट्र आणि जगभरातील अनेकांचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेजुरी खंडोबा येथून मोरगांवला जायचे असेल तर ते अंतर 17 किमी इतके आहे. (हेही वाचा, Ganeshotsav 2019: घरीच बनवा Eco Friendly Ganpati ; जाणून घ्या खास पद्धत (व्हिडिओ))
थेऊर श्री चिंतामणी
अष्टविनायक श्रृंकलेतील दुसरा गणपती म्हणजे थेऊर गावचा श्री चिंतामणी. या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे हे ठिकाण थेऊर येथील कदंब वृक्षाखाली आहे. भक्तांची चिंता हरणारा (दूर करणारा) गणपती असा या गणपतीचा लौकिक आहे. म्हणूनच याला श्री चिंतामणी असे म्हटले जाते. थेऊर श्री चिंतामणी हे पुणे - सोलापूर महामार्गापासून जवळ आहे. तसेच, पुणे शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. पुणे येथून बसनेही या गणपतीला जाता येते. उरळीकांचन येथील महात्मा गांधी स्थापीत निसर्गोपचार केंद्र हे देखील थेऊरपासूनच जवळच आहे.
सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक
अष्टविनायक श्रृंकलेत सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा गणपती तिसऱ्या क्रमांकावर येतो. या गणपतीची सोंड उजव्या बाजूला आहे. विशेष म्हणजे अष्टविनायकांपैकी हा एकमेव गणपती आहे ज्याची सोंड उजव्या बाजूला आहे. भीमा नदीकाठी वसेलेले हे स्वयंभू स्थान म्हणून ओळखले जाते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. हा गणपती अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येते. जे दौंड येथून साधारण 19 कि.मी. इतक्या अंतरावर आहे.
रांजणगाव महागणपती
रांजणगाव महागणपती हे एक स्वयंभू स्थान म्हणून ओळखले जाते. हे ठिकाणा पुणे- अहमदनगर मार्गावर असलेल्या शिरुर तालुक्यात आहे. अष्टविनायक गणपती श्रृंकलेत हा गणपती चौथ्या क्रमांकावर येतो.
ओझरचा विघ्नेश्र्वर
अष्टविनायकांपैकी ओझरचा गणपती हा एक श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो. हा गणपीसुद्धा स्वयंभू म्हणून ओळखला जातो. अष्टविनायक श्रृंकलेत हा गणपती पाचव्या क्रमांकावर येतो.
लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज
जुन्नर तालुक्यात कुकडीन नदी परिसरात असलेल्या डोंगरावर श्री गिरिजात्मज गणपतीचे मंदिर आहे. हा गणपतीही स्वयंभू आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी 400 पायऱ्या चढाव्या लागतात. पेशवे काळात या गणपतीचा जिर्नोद्धार झाल्याचा दाखला इतिहासात सापडतो. अष्टविनायक श्रृंकलेत हा गणपती सहाव्या क्रमांकावर येतो. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.
महडचा वरदविनायक
महडचा वरदविनायक हा अष्टविनायक श्रृंकलेत शेवटून दुसरा म्हणजे सातव्या क्रमांकावर येणारा गणपती आहे. हा गणपती स्वयंभू असून त्याला मठ असेही संबोधले जाते. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. या गणपतीच्या दर्शनास भाविक दूरदूर अंतरावरुन येतात.
पालीचा श्री बल्लाळेश्वर
श्री बल्लाळेश्वर हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. जो एक स्वयंभू स्थान म्हणून ओळखले जाते. अष्टविनायक दर्शनासाठी निघालेल्या भाविकाला या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवया त्याचे अष्टविनायक दर्शन पूर्ण झाले असे मुळीच मानता येत नाही.
गणपती विशेष व्हिडिओ
गणपती उत्सव म्हटलं की वातावरण कसं आनंदून गेलेले असते. लोक आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन येतात. बाप्पाचे आगमन झाले की लहान, थोर भाराऊन जातात. गणेश चतुर्थीपासून पुढचे काही दिवस केवळ बाप्पा आणि बाप्पांची सेवा. बस्स! इतकेच. मात्र, बाप्पांचे विसर्जन झाले की, मग बाप्पांच्या आठवणीत अनेकांची मनं व्याकूळ व्हायला लागतात. अशा वेळी अष्टविनायक दर्शन करायला काहीच हरकत नाही.