Bharadi Devi Jatra 2020: कोकणातील नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असणारी आंगणेवाडीच्या (Anganewadi Jatra) भराडीदेवीच्या (Bharadi Devi) यंदाच्या जत्रेला (17 फेब्रुवारी) आजपासून सुरूवात झाली आहे. या जत्रेला मुंबई, पुण्यासह देशा-परदेशातून भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. दीड दिवस चालणार्या देवीच्या या जत्रेमध्ये मालवणवासियांचा मोठा उत्साह पहायला मिळतो. आज जत्रेच्या निमित्ताने भराडी देवीच्या मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तर मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट केलेली आहे. दरम्यान आज जत्रेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थिती लावणार आहेत. त्यांच्यासोबतीला महाविकास आघाडीमधील मंत्री आणि अन्य नेते मंडळी देखील हजेरी लावणार आहेत. (Anganewadi Jatra 2020: भराडी देवीचा गोंधळ ते ताट लावण्याची प्रथा आंगणेवाडी जत्रेमध्ये असते या 8 गोष्टींचं आकर्षण!).
कसा असेल आजच्या मंदिरामधील दिवसभराचा कार्यक्रम
आज पहाटे 3 वाजल्यापासूनच भाविकांसाठी भराडी देवीच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान रात्री 9 ते 1 या चार तासांत आंगणे कुटुंबियांचे मंदिरात धार्मिक विधींचा कार्यक्रम पार पाडतील. मध्यरात्री एकनंतर दर्शन, ओटी भरणे आदी कार्यक्रम सुरू होतील. या जत्रेदरम्यान सुमारे 8-10 लाख भाविक दीड दिवसांत देवीच्या दर्शनासाठी कोकणामध्ये पोहचतात.
असा असतो मंदिर परिसरातील उत्साह
श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच सुरुवात होते. तर भाविकांना कमी वेळात दर्शन घेता यावे म्हणून आंगणे कुटुंबियांकडून विशेष सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मालवण आणि कणकवली स्थानकाहून येणाऱ्या दिव्यांगांना थेट मंदिरापर्यंत पोहचवण्यासाठी रिक्षाची सोय करुन देण्यात आली आहे. तर मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून रेल्वे मार्गावर आंगणेवाडीच्या भराडीदेवी जत्रेनिमित्त विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत.