International Yoga Day: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने देशात अनेक ठिकाणी होणार कार्यक्रम
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार व पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप एस. पुरी नवी दिल्लीतील लाल किल्ला येथून कार्यक्रमाचे नेतृत्व करतील.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात साजऱ्या होणाऱ्या यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या (International Yoga Day) अनुषंगाने आयुष मंत्रालयाने संपूर्ण भारतातील 75 प्रतिष्ठित ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची योजना आखली आहे. ज्यामुळे जागतिक स्तरावर भारताचे ब्रँडिंग करण्यात देखील मदत होईल. पंतप्रधान कर्नाटकातील मैसूर येथून कार्यक्रमाचे नेतृत्व करणार आहेत. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार व पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप एस. पुरी नवी दिल्लीतील लाल किल्ला येथून कार्यक्रमाचे नेतृत्व करतील. या कार्यक्रमाच्या आयोजनात पतंजली योगपीठ मंत्रालयासोबत सहभागी होत आहे.
पतंजली योगपीठाचे आचार्य बालकृष्ण हेदेखील मंचावर उपस्थित राहणार आहेत. पतंजली योगपीठातील सुमारे 12,000 सहभागी आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय व पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होतील. आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 साठी नोडल मंत्रालय असलेल्या आयुष मंत्रालयाने परिचालित केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार योग कार्यक्रम आयोजित केले जातील. हेही वाचा International Yoga Day: Shilpa Shetty, Sara Ali Khan ते Malaika Arora, 7 बॉलीवूड अभिनेत्रींच्या नितळ सौंदर्याचे गुपित आले समोर, तुम्हीपण जाणून घ्या रहस्य
मानवतेसाठी योग ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची संकल्पना आहे कारण त्यातून कोविड-19 महामारी शिखरावर असताना, योगाने मानवतेचे दुःख कसे कमी केले आणि कोविडपश्चात उदयोन्मुख भौगोलिक-राजकीय परिस्थितीतही लोकांची कशी सेवा केली,करुणा, दयाळूपणा याद्वारे लोकांना एकत्र कसे आणले, एकतेची भावना कशी वृद्धिंगत झाली, हे प्रतीत होते.