Antacid Esomeprazole Alert: समोर आले अँटासिड एसोमेप्राझोलचे धोकादायक दुष्परिणाम; फार्मा बॉडीने डॉक्टर, रुग्णांसाठी जारी केला अलर्ट
पोटात जास्त प्रमाणात ऍसिड असल्यास ऍसिड रिफ्लक्स आणि अल्सरसह इतर काही समस्या उद्भवतात व अशा परिस्थितींवर उपचार करण्यासाठी डॉक्टर एसोमेप्राझोल हे औषध लिहून देतात. डॉक्टर आणि रुग्ण दोघांनीही औषधांच्या प्रतिकूल प्रतिक्रियांबद्दल आयपीसीचा हा सल्ला गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे डॉ महेश गुप्ता यांनी सांगितले.
Antacid Esomeprazole Side Effects: फार्मा स्टँडर्ड बॉडी इंडियन फार्माकोपिया कमिशन (Indian Pharmacopoeia Commission- IPC) ने अॅसिड-रिफ्लक्स औषध एसोमेप्राझोलच्या (Esomeprazole) वापराबद्दल डॉक्टर आणि रुग्णांसाठी औषध सुरक्षा इशारा जारी केला आहे. आरोग्यसेवा व्यावसायिकांना आणि रुग्णांना या औषधाच्या दुष्परिणामांचे बारकाईने निरीक्षण करण्यास सांगण्यात आले आहे. सर्वसामान्यपणे हे औषध पोटातील ऍसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी घेतले जाते.
आता फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया (PvPI) च्या ‘प्राथमिक विश्लेषणात' असे आढळले आहे की, एसोमेप्राझोल हे औषध शरीरातील प्रोलॅक्टिन या हार्मोनला असामान्य मानल्या जाणार्या पातळीपर्यंत वाढवते. फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया हे औषधांच्या प्रतिकूल प्रतिक्रिया (ADRs) आणि फार्मास्युटिकल उत्पादनांशी संबंधित प्रतिकूल घटनांबद्दल माहितीचे निरीक्षण आणि संकलन करते.
न्यूज18 ने याबाबत वृत्त दिले आहे. आयपीसीने या औषधाबद्दल जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, एसोमेप्राझोलला ‘संशयित औषध’ म्हणून लेबल केले आहे. यामुळे ‘हायपरप्रोलॅक्टिनेमिया’ (Hyperprolactinemia) होण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. हायपरप्रोलॅक्टिनेमिया ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या रक्तात प्रोलॅक्टिन हार्मोनची पातळी सामान्यपेक्षा जास्त असते. या स्थितीमुळे वंध्यत्व, हाडांच्या झीज, दृष्टी कमी होणे, पुरळ, शरीर आणि चेहऱ्यावरील केसांची जास्त वाढ आणि स्नायूंच्या वस्तुमानात घट झाल्यामुळे हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका वाढू शकतो.
सन फार्मा, टोरेंट, फायझर, सिप्ला आणि ल्युपिनसह मोठ्या आणि महत्वाच्या औषध कंपन्यांद्वारे एसोमेप्राझोल हे औषध उत्पादित केले जाते. हे औषध गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग (GERD), झोलिंगर-एलिसन सिंड्रोम आणि पेप्टिक अल्सर रोगाच्या उपचारांमध्ये वापरले जाते. एसोमेप्राझोलचे वर्गीकरण प्रोटॉन पंप इनहिबिटर (PPI) म्हणून केले जाते, जे पोटातील ऍसिडचे उत्पादन कमी करते, ज्यामुळे अतिरिक्त ऍसिडिटीशी संबंधित अपचन आणि छातीत जळजळ यापासून आराम मिळतो.
आता 27 सप्टेंबरच्या आयपीसी अलर्टमध्ये म्हटले आहे की, डॉक्टर्स, रुग्ण किंवा ग्राहकांना एसोमेप्राझोल औषधाच्या वापराशी संबंधित प्रतिकूल औषध प्रतिक्रिया (ADR) च्या शक्यतेचे बारकाईने निरीक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये पुढे असेही म्हटले आहे की, औषधांच्या अशा प्रतिक्रिया आढळल्यास, कृपया संशयित प्रतिकूल औषध प्रतिक्रिया अहवाल फॉर्म भरून NCC-PvPL, IPC कडे तक्रार नोंदवा. (हेही वाचा: Deaths Due to Heart Ailments: महाराष्ट्रात 2022 मध्ये 200 हून अधिक मुलांचा हृदयविकाराने मृत्यू)
दरम्यान, पोटात जास्त प्रमाणात ऍसिड असल्यास ऍसिड रिफ्लक्स आणि अल्सरसह इतर काही समस्या उद्भवतात व अशा परिस्थितींवर उपचार करण्यासाठी डॉक्टर एसोमेप्राझोल हे औषध लिहून देतात. डॉक्टर आणि रुग्ण दोघांनीही औषधांच्या प्रतिकूल प्रतिक्रियांबद्दल आयपीसीचा हा सल्ला गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे डॉ महेश गुप्ता यांनी सांगितले. जे रुग्ण हे औषध घेत आहेत त्यांनी या औषधाचे काही प्रतिकूल परिणाम दिसल्यास किंवा त्यांच्या आरोग्यामध्ये कोणतीही असामान्य लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना कळवावे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)