योगी आदित्यनाथ यांचा मोठा निर्णय! वडील आनंद सिंह बिष्ट यांच्या अंत्यविधीला हजेरी न लावता पाळणार लॉक डाऊनचे नियम
देशभरात सुरु असणाऱ्या लॉक डाऊनच्या (Lockdown) पार्श्वभुमीवर योगी आदित्यनाथ यांनी वडिल आनंद सिंह बिष्ट यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (PM CM Yogi Adityanath) यांचे वडील आनंद सिंह बिष्ट (Anand Singh Bishta) यांचे आज सकाळी 10 वाजून 44 मिनिटांनी दिल्लीतील (Delhi) AIIMS रुग्णालयात निधन झाले आहे. त्यांच्यावर उत्तराखंड मधील यमकेश्वर च्या पंचूर गावाच्या पैतृक घाट येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. देशभरात सुरु असणाऱ्या लॉक डाऊनच्या (Lockdown) पार्श्वभुमीवर योगी आदित्यनाथ यांनी वडिलांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी एका पत्रकातून माहिती दिली. देशात लॉकडाऊन असताना गर्दी होऊ नये या हेतूने मी हा निर्णय घेत आहे, वडिलांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याची इच्छा असूनही मनावर दगड ठेवून हा निर्णय घेताना दुःख होतेय मात्र तरीही कोरोनाच्या संकटाला (Coronavirus) लढा देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे असे योगी आदित्यनाथ यांनी पत्रकात म्हंटले आहे.
देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार 3 मे पर्यंत लॉक डाऊन असणार आहे, त्यामुळे गर्दी न करण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. अशावेळी योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा आपल्या राज्यात नागरिकांना घरी राहण्याच्या सूचना केल्या आहेत, मात्र आपल्याकडूनही हा नियम भंग होऊ नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
ANI ट्विट
प्राप्त माहितीनुसार, आनंद सिंह हे 89 वर्षाचे होते. बिष्ट यांना किडनी आणि लिव्हरच्या आजारांनी ग्रासले होते. मागील महिन्यात म्हणजेच 13 मार्च रोजी त्यांना तब्येत आणखीन खालावल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती आणखीन नाजूक होत होती, त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. अखेरीस आज सकाळी त्यांचे निधन झाले.