कुस्तीपटू Sushil Kumar तिहार तुरुंगात कैद्यांना देत आहे फिटनेस आणि कुस्तीचे प्रशिक्षण

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या सहा ते सात कैदी सुशील कुमारकडून फिटनेस आणि कुस्तीचे धडे शिकत आहेत.

सुशील कुमार (Photo Credits: Instagram)

खुनाच्या आरोपाखाली तिहार तुरुंगात (Tihar Jail) बंद असलेला ऑलिम्पियन सुशील कुमार (Sushil Kumar) कैद्यांना फिटनेस (Fitness) आणि कुस्तीचे प्रशिक्षण (Wrestling Coaching) देत आहे. तुरुंग प्रशासनाने त्याला परवानगी दिली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या सहा ते सात कैदी सुशील कुमारकडून फिटनेस आणि कुस्तीचे धडे शिकत आहेत.

तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, नुकतेच सुशील कुमारने हे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही कैद्याला कुस्ती शिकायची असेल तर सुशील त्यांना प्रशिक्षण देऊ शकतो. अधिकाऱ्यांनी सांगितले की, याआधी सुशीलला इतर कैद्यांना फिटनेस आणि कुस्तीचे प्रशिक्षण देण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे हे प्रशिक्षण सुरू होऊ शकले नाही. आता कोरोनाची प्रकरणे कमी झाल्यानंतर सुशील कैद्यांना फिटनेस प्रशिक्षण देऊ शकतो. 23 मे 2021 रोजी छत्रसाल स्टेडियमवर सागर धनकर यांच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पियन सुशील कुमारला अटक करण्यात आली होती. (वाचा - Punjab Assembly Elections 2022 Results: Bhagwant Mann यांनी घेतली राज्यपालांची भेट; 16 मार्चला घेणार पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ)

दरम्यान, 4 आणि 5 मे च्या मध्यरात्री दिल्लीतील मॉडेल टाऊन भागातील छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीपटूंच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या लढतीत सागर धनखर नावाचा पैलवान मारला गेला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान ऑलिम्पिक चॅम्पियन सुशील कुमारचेही नाव समोर आले. तपासादरम्यान पोलिसांना एक व्हिडिओही सापडला, ज्यामध्ये सुशील कुमार मारहाण करताना दिसत होता.

सप्टेंबर 2021 मध्ये, कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेपूर्वी, दिल्ली तुरुंग विभागाने तिहारमधील कैद्यांना विविध खेळांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला होता. एका प्रकल्पांतर्गत कैद्यांना खो-खो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बुद्धिबळ आणि कॅरम या सहा खेळांचे प्रशिक्षण दिले जात होते. तुरुंग प्रशासनाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुशील कुमारच्या कोचिंग क्लासचा फायदा सर्व कैद्यांना होईल. यामुळे सर्व कैदी तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. तसेच या प्रक्रियेमुळे कैदी व्यस्त राहतील.