राहुल गांधी यांची मोठी घोषणा; जर सत्तेत आलो तर महिला आरक्षण विधेयक मंजूर करू
मात्र आता आपण सत्तेवर आलो तर हे विधेयक मजूर करू असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे
यंदाच्या लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) तोंडावर आल्या आहेत. देशातील सर्वच महत्वाच्या पक्षांसाठी या निवडणुका फार महत्वाच्या आहेत. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आणि भाजप एकमेकांना शह देण्यासाठी जनतेन अनेक प्रलोभने दाखवत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशमध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती, आता केरळमध्ये एका भाषणात त्यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर भर दिला. जर 2019 मधील लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची सत्ता आली तर महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) संमत होण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
महिलांना 33 टक्के आरक्षण मिळावे यासाठी हे विधेयक आहे. गेली कित्येक महिने या विधेयकावर लोकसभा आणि विधानसभेमध्ये एकमत न होऊ शकल्याने आजपर्यंत ते मंजूर झाले नाही. मात्र आता आपण सत्तेवर आलो तर हे विधेयक मजूर करू असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे. (हेही वाचा : राहुल गांधी यांनी फोटोग्राफरचा पकडला हात; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)
याबाबत राहुल गांधी म्हणाले, ‘आम्ही महिलांना नेतृत्वाच्या स्तरावर पाहू इच्छितो, यासाठी हे विधेयक मंजूर होणे फार महत्वाचे आहे. कॉंग्रेसने नेहमीच देशाचा विचार केला आहे. आम्ही जे वचन देतो ते पूर्ण करतो. कॉंग्रेसने गरिबांसाठी अनेक योजनांची घोषणा केली आणि त्या पूर्णही केल्या. आम्ही बदलाच्या राजकारणावर विश्वास ठेवतो.’ दरम्यान यावेळी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदींनी धनाढ्य लोकांना कमाल उत्पन्नाची हमी दिली आहे. तर आम्ही गरिबांना किमान उत्पन्नाची हमी देणार आहोत असे राहुल गांधी म्हणाले.