Milk (Photo Credits: Facebook)

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोशल मीडियावर 1 मार्चपासून दुध 100 प्रतिलिटर दराने विकले जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. नेटीझन्सनी यासंदर्भात हँशटॅग केला असून हा हँशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे. दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने असं म्हटलं आहे की, शेतकऱ्यांनी 1 ते 5 मार्च दरम्यान दूध विक्री करू नये किंवा दुधाचे भाव वाढवावेत, असे कोणतेही आवाहन त्यांनी केलेले नाही.

रविवारी जारी केलेल्या निवेदनात संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे की, त्यांच्याकडून दूध विक्री करु नये किंवा त्याची किंमत 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढवावी असा कोणताही निर्णय झालेला नाही. किसान मोर्चाच्या नावाने सोशल मीडियावर चुकीचे व्हिडिओ, मेसेज व्हायरल होत आहेत. त्यात शेतकऱ्यांनी दुधाची किंमत वाढवल्याचे सांगितले जात आहे. (वाचा - 1 मार्चपासून दुधाची किंमत प्रति लिटर 100 रुपये होणार? ट्विटरवर का ट्रेंड होतोय 'हा' हँशटॅग, जाणून घ्या सविस्तर)

सोशल मीडियावर युनायटेड किसान मोर्चाच्या नावाने व्हायरल होत असलेल्या अशा मेसेजेस व व्हिडीओजकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. किसान मोर्चाने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मोर्चाच्या नावाने एक संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजचे उत्तर म्हणून किसान मोर्च्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी अशा अफवांकडे लक्ष देऊ नये, असं आाहनही किसान मोर्चाने केले आहे.

अफवांमध्ये पसरवण्यात आलेला व्हायरल संदेश -

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे दुधाचे दरही शंभरी पार करणार असल्याचे वृत्त सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर #1मार्च_से_दूध_100_लीटर हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्याअंतर्गत असा दावा केला जात आहे की, 1 मार्चपासून दुधाची किंमत प्रति लिटर 100 रुपये असेल. मात्र, आता किसान मोर्चाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.