जेव्हा मी पाकिस्तानमधील परिस्थितीबद्दल वाचतो, तेव्हा मला हिंदुस्थानी मुस्लिम असल्याचा अभिमान वाटतो - गुलाम नबी आझाद
आज राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Congress MP Ghulam Nabi Azad) यांचादेखील समावेश आहे. कार्यकाळ संपणारे चारही सदस्य जम्मू काश्मिरचं प्रतिनिधित्व करतात. राज्यसभेतील सेवानिवृत्तीच्या भाषणात गुलाम नबी आझाद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मी त्या भाग्यवान लोकांपैकी आहे, जे कधीही पाकिस्तानमध्ये गेले नाहीत. जेव्हा मी पाकिस्तानमधील परिस्थितीबद्दल वाचतो, तेव्हा मला हिंदुस्थानी मुस्लिम असल्याचा अभिमान वाटतो, अशी भावनाही गुलाम नबी आझाद यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुलाम नबी आझाद यांचे कौतुक करताना भावूक झाले. दहशतवादी हल्ल्यानंतरची आझाद यांच्याबद्दलचा अनुभव सांगताना मोदींच्या डोळ्यातून अश्रू आले. गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, एकदा गुजरातमधील प्रवाशांवर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात सुमारे 8 जणांचा मृत्यू झाला होता. सर्व प्रथम मला गुलाम नबी जीचा फोन आला. तो फोन फक्त माहिती देण्यासाठी नव्हता. त्याचे अश्रू थांबत नव्हते. यावेळी त्यांनी मला बोलावलं आणि माझी त्याच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेतली. तो माझ्यासाठी खूप भावनिक क्षण होता.
पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, 'मला चिंता आहे की गुलाम नबी यांच्यानंतर जोकोणी हे पदभार स्वीकारेल, त्याची गुलाम नबीजी यांच्यासोबत तुलना करणं कठीण होईल. कारण, आझाद यांनी नेहमी आपल्या पक्षाबरोबरचं देशाची चिंता केली.
जम्मू-काश्मीरच्या चार राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाळ आज संपत आहे. यात गुलाम नबी आझाद, शमशेर सिंह, मीर मोहम्मद फैज, नादिर अहमद या खासदारांचा समावेश आहे. या चारही खासदारांनी आपले योगदान, आपला अनुभव, ज्ञान यांचा वापर देशाच्या कल्याणासाठी केला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे खास आभार मानले.