Weather Updates in India: दिल्ली-यूपीसह उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा कहर; 'या' राज्यांमध्ये पडणार पाऊस

22 जानेवारीपासून पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये पाऊस, गारपीट आणि कडाक्याची थंडी पडणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Weather updates in India: राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. दरम्यान, शुक्रवारी हवामान खात्याने सांगितले की, आज उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हवामानात बदल होऊ शकतो. खरं तर, हवामान खात्याने सांगितले की, आजपासून म्हणजेच 22 जानेवारीपासून पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये पाऊस, गारपीट आणि कडाक्याची थंडी पडणार आहे. गेल्या आठवडाभरापासून दिल्लीकरांना सतत थंडीचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, यूपीमध्ये थंडी आणि धुक्याने कहर केला आहे, तर बिहारमधील लोक थंडीच्या लाटेने हादरले आहेत. राजस्थानमध्येही थंडी पडली आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) शुक्रवारी मध्य प्रदेशातील 19 जिल्ह्यांमध्ये वादळ, गारपीट आणि पावसाच्या अंदाजादरम्यान 'ऑरेंज अलर्ट' जारी केला. IMD ने ग्वाल्हेर, दतिया, भिंड, मुरैना, निवारी, छतरपूर आणि टिकमगड जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी मध्यम आणि दाट धुक्याचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही अलर्ट शनिवारी सकाळपर्यंत लागू आहेत. (वाचा - Co-WIN येथे कोरोनावरील लस घेण्यासाठीएकाच मोबाइल क्रमांकावरुन 4 ऐवजी 6 जणांना रजिस्ट्रेशन करता येणार)

दरम्यान, ग्वाल्हेर, शिवपुरी, गुना, दतिया, अशोक नगर, श्योपूर, मुरैना, भिंड, नीमच, मंदसौर, रतलाम, राजगढ, आगर माळवा, विदिशा, टिकमगड, छतरपूर, निवारी, दमोह आणि सागर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट असल्याचे त्यांनी सांगितले. आयएमडीच्या भोपाळ कार्यालयातील वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ पी.के. साहा म्हणाले की, दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून त्यामुळे नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळेल. मात्र, पश्चिम मध्य प्रदेशात तीन दिवसांनंतर किमान तापमानात घट होऊन थंडी वाढण्याचा अंदाज आहे.

साहा म्हणाले की, मध्य प्रदेशातील सर्वात कमी किमान तापमान छतरपूर जिल्ह्यातील खजुराहो येथे 6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर भोपाळमध्ये कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 25.6 आणि 11.3 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सामान्यपेक्षा जास्त आहे. तर इंदूरमध्ये 25.8 आणि 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जबलपूरमध्ये कमाल तापमान 25.7 आणि किमान तापमान 10.4 अंश सेल्सिअस, ग्वाल्हेरमध्ये कमाल तापमान 16.4 आणि किमान तापमान 7.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

जम्मू-काश्मीरमध्ये थंडीपासून दिलासा -

काश्मीर खोऱ्यातील बहुतांश भागात लोकांना थंडीपासून थोडासा दिलासा मिळाला आणि केवळ गुलमर्ग आणि पहलगाम पर्यटन स्थळांमध्ये किमान तापमान शून्याच्या खाली नोंदवले गेले. त्याचवेळी, शनिवारपासून पुढील दोन दिवस केंद्रशासित प्रदेशाच्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. हवामान खात्याने म्हटले आहे की, सक्रिय पश्चिमी विक्षोभामुळे शनिवारपासून पुढील दोन दिवस जम्मू आणि काश्मीरच्या बहुतांश भागात मध्यम पाऊस किंवा बर्फवृष्टी होऊ शकते.