Uttarakhand Glacier Burst Updates: उत्तराखंडमधील तपोवन बोगद्याजवळ बचावकार्य सुरू; 170 लोक बेपत्ता, तर आतापर्यंत 14 जणांचे मृतदेह ताब्यात

बोगद्यातील मोठे दगड हटविण्यासाठी येथे मोठ्या मशीन वापरल्या जात आहेत. चमोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणाहून एकूण 14 मृतदेह सापडले आहेत.

Uttarakhand Glacier Burst Updates (Photo Credits-ANI Twitter)

Uttarakhand Glacier Burst Updates: उत्तराखंडच्या चामोलीमध्ये हिमकडा (Uttarakhand Glacier Burst) कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर भारतीय सैन्यदल, हवाई दल, नेव्ही आणि एनडीआरएफकडून मदतकार्य सुरू आहे. पीएम मोदींसह उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला यासंदर्भात विशेष सूचना दिल्या आहेत. दरम्यान, या दुर्घटनेनंतर 170 लोक बेपत्ता असल्याची माहिती आयटीबीपीने दिली आहे. चामोलीतील तपोवन बोगद्यातून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. बोगद्यातील मोठे दगड हटविण्यासाठी येथे मोठ्या मशीन वापरल्या जात आहेत. चमोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणाहून एकूण 14 मृतदेह सापडले आहेत. तसेच बोगद्यात एकूण 15 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

बचाव मोहिमेत गुंतलेल्या आयटीबीपी टीमच्या मते, सुमारे 30 लोक बोगद्यात अडकले आहेत. बोगद्यात अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी 300 जवान तैनात करण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या मते सुमारे 170 लोक बेपत्ता आहेत. (वाचा - Uttarakhand Flood: नक्की का घडली उत्तराखंड दुर्घटना? कोण जबाबदार? जाणून घ्या काय म्हणतात Environment Experts)

दरम्यान, सोमवारी सकाळपर्यंत पाण्याचा प्रवाह बऱ्यापैकी कमी झाला आहे. परंतु, काही ठिकाणी तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तपोवन प्रकल्पाजवळ पाणी आणि गाळ साचला आहे. येथून जवळपास 16 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. अद्याप अनेकजण या ठिकाणी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

आयटीबीपीचे जवान तपोवन येथे अडकलेल्या लोकांना बोगद्यातून बाहेर काढण्यात गुंतले आहेत. बोगद्यात मोठ्या प्रमाणात कचरा आणि पाण्यामुळे लोकांना तेथून बाहेर काढणे अवघड होत आहे. या दुर्घटनेनंतर तीन आयएएफ हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. ज्यात Mi-17 आणि एक ALH ध्रुव चा समावेश आहे. या हेलिकॉप्टरवर पूरग्रस्त भागात बचाव करण्याचे काम सोपविण्यात आले आहे.