Delhi: स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरवणे आयएएस अधिकाऱ्याला पडले महाग, सरकारने केली लडाखमध्ये बदली

केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, संजीव खिरवार यांची लडाखमध्ये आणि त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांची अरुणाचल प्रदेशात बदली करण्यात आली आहे.

Photo Credit - Twitter

आयएएस जोडपे (IAS Officer) दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये (Thyagraj Stadium Complex) डॉग वॉकसाठी गेले होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने (Union Home Ministry) आयएएस दाम्पत्य संजीव खिरवार (Sanjeev Khirwar) आणि रिंकू दुग्गा यांची बदली केली आहे. संजीव खिरवार आणि त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांनी त्यागराज स्टेडियममधील सुविधांचा गैरवापर केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, संजीव खिरवार यांची लडाखमध्ये आणि त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांची अरुणाचल प्रदेशात बदली करण्यात आली आहे. दोघेही 1994 कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. एका प्रशिक्षकाने सांगितले की, पूर्वी आम्ही रात्री 8.30 वाजेपर्यंत प्रशिक्षण घ्यायचो, परंतु आता आम्हाला फक्त 7 वाजता मैदान सोडण्यास सांगितले जाते जेणेकरून अधिकारी आपल्या कुत्र्याला फिरवू शकेल. त्यामुळे आमचे प्रशिक्षण आणि व्यायामाचा दिनक्रम विस्कळीत होत असे.

Tweet

काय आहे प्रकरण?

या प्रकरणात माध्यमांमध्ये आलेल्या बातमीनुसार 'गेल्या काही महिन्यांपासून खिरवार यांना संध्याकाळी स्टेडिअममध्ये डॉग वॉक करता यावा म्हणून खेळाडूंना लवकर मैदामाच्या बाहेर काढले जात असे. यापूर्वी रात्री 8.30 -9 पर्यंत खेळाडू त्यागराज स्टेडिअममध्ये सराव करत, पण खिरवार यांच्या फिरण्यात अडथळा नको म्हणून त्यांना संध्याकाळी 7 वाजताच मैदानाच्या बाहेर काढले जात असे. याचा परिणाम खेळाडूंच्या सरावावर होत होता. संजीव खिरवार  यांनी आपण कधी-कधी कुत्र्यासोबत इथं फिरायला येतो,  हे  मान्य केलं होतं. त्यामुळे सरावात अडथळा निर्माण केल्याचा आरोप त्यांनी फेटाळला होता. आपण कुत्र्याला कधीही ट्रॅकवर सोडत नाही, तसंच कोणत्याही खेळाडूला बाहेर जाण्यास कधी सांगितलं नाही, असा त्यांनी दावा केला होता. (हे देखील वाचा: देशातील 2100 राजकीय पक्षांवर निवडणूक आयोग करणार मोठी कारवाई; जाणून घ्या नक्की काय आहे कारण)
सरकारनं केली तातडीने कारवाई
दरम्यान, हा प्रकार समोर येताच, सरकारनंही तातडीनं कारवाई केली. दिल्ली सरकारनं सांगितलं की, आतापासून दिल्लीतील सर्व स्टेडियम रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहतील. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली. त्यांनी लिहिलं की, स्टेडियम लवकर बंद केल्यामुळे खेळाडूंना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व स्टेडियम 10 वाजता बंद करण्याचे आदेश दिले आहे. जेणेकरून खेळाडूंना सराव करताना कोणतीही अडचण येणार नाही. त्यागराज स्टेडियम 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी बांधण्यात आलं होतं.