Chenab Rail Bridge: जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलावर धावली ट्रेन, दुसरी चाचणीही यशस्वी (Watch Video)
यादरम्यान ट्रेन जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलावरूनही गेली. हा पूल आयफेल टॉवरपेक्षाही उंच आहे. या पुलाची उंची 359 मीटर असून आयफेल टॉवरची उंची 300 मीटर आहे.
Chenab Rail Bridge: उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पांतर्गत रेल्वेने काश्मीरला (Jammu-Kashmir) जाणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. हे स्वप्न हळूहळू वास्तवाच्या जवळ येत आहे. गुरुवारी सांगलदन ते रियासी या दहा डब्यांच्या ट्रेनची ट्रायल रन घेण्यात आली. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली. यादरम्यान ट्रेन जगातील सर्वात उंच (World's Highest) चिनाब रेल्वे पुलावरूनही (Chenab Rail Bridge) गेली. हा पूल आयफेल टॉवरपेक्षाही उंच आहे. या पुलाची उंची 359 मीटर असून आयफेल टॉवरची उंची 300 मीटर आहे. 1,486 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पुलाच्या बांधकामात 30 हजार मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. हा पूल ताशी 260 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे सहन करू शकते.
गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास सांगदान येथून रियासीकडे गाडी निघाली. दुपारी दोनच्या सुमारास ट्रेन रियासी रेल्वे स्थानकावर पोहोचली. प्रकल्पावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनमध्ये बसवण्यात आले. याशिवाय रेल्वेचे अधिकारीही तेथे उपस्थित होते. ट्रेन रियासी रेल्वे स्थानकावर येताच भारत माता की जयचा जयघोष झाला. या क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी स्थानिक नागरिक घटनास्थळी उपस्थित होते. रियासी ते काश्मीर ही ट्रेन लवकरच धावू शकते, असे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - Anji-Khad Bridge: जम्मु काश्मिरमधील अंजी नदीवरील भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल पूर्णत्वाकडे; अभियांत्रिकी चमत्कार आहे 'हा' पूल)
पहा व्हिडिओ -
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे ट्विट -
तथापी, रविवारी 16 जून रोजी सांगलदन ते रियासीपर्यंत रेल्वे इंजिनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. सांगलदन ते रिसासी या ट्रेनची यशस्वी चाचणी झाल्यानंतर लोकांमध्ये विशेषत: तरुणांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. रविवारी पहिली चाचणी पाहण्यासाठी रियासी स्थानकावर तरुणांचीही गर्दी झाली होती. या ट्रॅकवर गाड्या धावल्यानंतर व्यवसाय वाढणार असून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.