Independence Day 2022: आपल्या मातीत खूप सामर्थ्य असून भारताचा 75 वर्षांचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे - पंतप्रधान मोदी
आज सर्व देशवासियांना अशा प्रत्येक महापुरुषाला, प्रत्येक बलिदानाला व त्यागकर्त्याला नतमस्तक होण्याची संधी आहे.
Independence Day 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित लाल किल्ल्यावर (Red Fort) 9 व्यांदा 'तिरंगा' फडकवला. ही परंपरा पुढे चालू ठेवत ते लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, भारत ही लोकशाहीची जननी आहे. आज संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. आज जगाच्या कानाकोपऱ्यात तिरंगा अभिमानाने आणि गौरवाने फडकत आहे. आपल्या मातीत खूप सामर्थ्य आहे. भारताचा 75 वर्षांचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं.
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या क्रांतिकारकांचे स्मरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना सांगितले की, स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या या अमृतोत्सवानिमित्त मी जगभरात पसरलेल्या भारतप्रेमींना, भारतीयांना शुभेच्छा देतो. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशासाठी बलिदान देणाऱ्या बापू, नेताजी सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर आदी महापुरुषांचा उल्लेख केला. (हेही वाचा - Independence Day 2022: स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरुन भाषण (पाहा व्हिडिओ))
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारतात असा एकही कोपरा नव्हता, असा काळ नव्हता, जेव्हा देशवासीयांनी शेकडो वर्षे गुलामगिरीविरुद्ध लढा दिला नाही, यातना सहन केल्या नाहीत, बलिदान दिले नाही. आज सर्व देशवासियांना अशा प्रत्येक महापुरुषाला, प्रत्येक बलिदानाला व त्यागकर्त्याला नतमस्तक होण्याची संधी आहे.
आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. एक टप्पा, नवा मार्ग, नवा संकल्प आणि नवे सामर्थ्य घेऊन पुढे जाण्याचा हा शुभ प्रसंग आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याने अनेक रूपे धारण केली हे देशाचे सौभाग्य आहे. यापैकी एक ते स्वरूप होते, ज्याच्या अंतर्गत महर्षी अरविंद, स्वामी विवेकानंद, नारायण गुरु यांसारखे लोक देशाचे चैतन्य जागृत करत राहिले.
गेल्या वर्षभरात देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर देशवासीयांनी अनेक कार्यक्रम केले. एकाच ध्येयाने एवढा उत्सव देशात क्वचितच झाला असेल. ज्या महापुरुषांना काही कारणास्तव इतिहासात स्थान मिळाले नाही किंवा विस्मरणात गेले अशा महापुरुषांचे स्मरण करण्याचे प्रयत्न भारताच्या कानाकोपऱ्यात झाले. या क्रांतिकारकांना आणि सत्याग्रहींना देशाने सलाम केला, असंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.