Uttar Pradesh: कोरोना लसीच्या ऐवजी रेबिजची लस देणारा फार्मासिस्ट निलंबित; जिल्हा मॅजिस्ट्रेट यांनी केली कारवाई

मात्र, चुकून या महिला जनरल ओपीडीमध्ये गेल्या.

Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

Uttar Pradesh: शामलीतील कांधला आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणासाठी (Corona Vaccination) गेलेल्या तीन महिलांना अँटी रेबीज इंजेक्शनच्या (Rabies Vaccine) प्रकरणात जिल्हा मॅजिस्ट्रेट यांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली. डीएमच्या सूचनेवरून सीएचसीमध्ये तैनात फार्मासिस्टला निलंबित करण्यात आले आहे. तसेच सीएचसीने लसीकरण केंद्रातील प्रभारीकडे या प्रकरणी तीन दिवसांत स्पष्टीकरण मागितले आहे.

डीएम जसजित कौर यांनी कोरोना लसीऐवजी कांधला सीएचसी येथे वृद्ध महिलांना अँटी रेबीजच्या इंजेक्शनच्या वृत्ताची दखल घेत एसडीएम कैराना व एसीएमओ शामली डॉ. अनिल कुमार यांच्याकडे चौकशी सोपविली होती. दोन्ही अधिकाऱ्यांच्या तपासणीत असे आढळले की, गुरुवारी कांधला आरोग्य केंद्रात कोरोना लस घेण्यासाठी तीन महिला आल्या होत्या. मात्र, चुकून या महिला जनरल ओपीडीमध्ये गेल्या. (वाचा - Coronavirus in India: भारतात आज कोविड-19 रुग्णांची सर्वात मोठी वाढ! 1,45,384 नव्या कोरोनाबाधितांची नोंद)

तेथील फार्मासिस्ट काही कामानिमित्त बाहेर गेले होते आणि त्याच्या जागी जन औषाधी केंद्राचा फार्मासिस्ट असलेली एक खासगी व्यक्ती बसली होती. त्या खासगी व्यक्तीने कोणताही कागद न पाहता महिलांना अँटी रेबीजची इंजेक्शन दिले. चौकशी अहवालाच्या आधारे डीएम यांनी संबंधित फार्मासिस्टला जन औषधी केंद्राच्या खासगी व्यक्तीची सेवा त्वरित निलंबित आणि संपुष्टात आणण्याचे निर्देश दिले. तसेच दुर्लक्षामुळे वैद्यकीय अधीक्षक सीएचसी कांधला यांना तीन दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे.

डीएम जसजित कौर यांनी सांगितले की, कांधला सीएचसी प्रकरणात फार्मासिस्टला तात्काळ निलंबित करण्यात आले असून सीएचसी अधीक्षकास इशारा देण्यात आला आहे. तसेच खाजगी फार्मासिस्टची सेवाही संपुष्टात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.