Agnipath Scheme: 'अग्निपथ' योजना मागे घेणार नाही; आंदोलकांना सैन्यात प्रवेश नाही, सेना दलाची घोषणा
तशी घोषणा तीनही सेना दलाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.
'अग्निपथ' (Agnipath Scheme) संदर्भात देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने होत असताना, लष्कराने रविवारी ही योजना मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रविवारी तिन्ही दलांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत (Press Conference) आता यातूनच सर्व भरती होणार असल्याचे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेदरम्यान, डीएमएचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी (Anil Puri) म्हणाले की, युवकाला भरतीआधी हिंसा, तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. पोलीस व्हेरिफिकेशन हे शंभर टक्के करावं लागणार, ते असल्याशिवाय अग्निवीरांना सेवा जॉईन करता येणार नाही. त्यामुळे आंदोलक विद्यार्थ्यांनी आपला वेळ वाया घालवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जर त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला गेला तर ते सैन्यात भरती होऊ शकत नाहीत. इच्छुकांना नावनोंदणी फॉर्मचा भाग म्हणून लिहिण्यास सांगितले जाईल की ते हिंसाचाराचे भाग नव्हते, त्यांची पोलिस पडताळणी केली जाईल.
वेळेपूर्वी बरेच सैनिक घेतात निवृत्ती
या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, दरवर्षी सुमारे 17,600 जवान मुदतपूर्व निवृत्ती घेतात, असे नाही की लोक केवळ अग्निपथ योजनेतून (लष्करातून) बाहेर पडतील. अग्निपथ भरती योजनेवर संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सशस्त्र दलांच्या वयाशी संबंधित प्रोफाइल कमी करण्यासाठी आम्ही ही सुधारणा आणत आहोत.
चार वर्षां नंतर अग्निवीरांचे काय होणार?
चार वर्षांनंतर अग्निवीरांचे काय होणार या प्रश्नाचे उत्तर लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी दिले. याला उत्तर देताना ते म्हणाले की, एकदा ते सैन्यात भरती झाला की त्यांना नेहमीच सैनिक म्हटले जाते. अशा परिस्थितीत 25 टक्के लोकांना आम्ही पुढील नोकऱ्या देऊ. उर्वरित 75 टक्के लोक अनेकदा त्यांच्या राज्यात परत जातात, त्यांना अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी मिळतात. प्रक्रिया पुढे जाऊ द्या, त्यांच्याबद्दलही काहीतरी उपाय सापडेल.
अग्निवीर नियमित सैनिकापेक्षा किती आहे वेगळा
संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अग्निवीरांच्या सेवा शर्ती नियमित सैनिकांप्रमाणेच असतील. आतापर्यंत दोघांच्या सेवेच्या अटींमध्ये कोणताही फरक सांगितलेला नाही.
Tweet
कधी सुरु होणार भरती?
वायुसेना 24 जूनपासून अग्निपथ योजनेअंतर्गत नोंदणी प्रक्रिया सुरू करेल, ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया 24 जुलैपासून सुरू होईल. अग्निवीरांची पहिली तुकडी डिसेंबरमध्ये वायुसेनेत दाखल होणार असून, प्रशिक्षण 30 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
योजना मागे घेणार नाही
ही योजना मागे घेण्याची विरोधकांकडून सातत्याने मागणी होत आहे. मात्र ही योजना मागे घेतली जाणार नसल्याचे या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले आहे.
नौदलात महिला आणि पुरुष दोघांची भरती
नौदल अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही अग्निपथ योजनेअंतर्गत महिला आणि पुरुष दोघांची भरती करत आहोत. भारतीय नौदल जूनपर्यंत अग्निपथ योजनेंतर्गत भरतीचा तपशील घेऊन येईल. अग्निवीरांची पहिली तुकडी 21 नोव्हेंबरपासून प्रशिक्षण संस्थांना अहवाल देण्यास सुरुवात करेल.
20 जूनला येणार पहिले नोटिफिकेशन
लष्कराच्या अधिकाऱ्याने पत्रकार परिषदेत सांगितले की, सोमवार, 20 जून रोजी अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्य भरतीसाठी पहिले नोटिफिकेशन जारी करण्यात येईल. अग्निपथ योजनेंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन संपूर्ण भारतात ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये केले जाईल. (हे देखील वाचा: Agnipath Protests: संरक्षण मंत्रालयातील10 टक्के नोकऱ्या 'अग्निवीरांसाठी' राखीव ठेवणार RMO चं ट्वीट)
फेब्रुवारी 2023 पर्यंत 40 हजार भरती
सुमारे 25,000 अग्निवीरांची पहिली तुकडी डिसेंबरमध्ये लष्करात सामील होणार आहे. अग्निवीरांची दुसरी तुकडी पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत लष्करात दाखल होणार आहे. अग्निपथ योजनेंतर्गत सुमारे 40,000 अग्निवीरांची भरती करण्यासाठी लष्कर 83 रॅली आयोजित करेल.