निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपींना 16 डिसेंबर रोजी फाशीची शक्यता; दिल्लीच्या तिहार कारागृहात तयारी सुरु, बिहारहून मागवले दोरखंड - रिपोर्ट
दिल्लीतील तिहार तुरूंगामध्ये याबाबत तयारीही सुरु झाली आहे.
दिल्ली (Delhi) येथील सामूहिक बलात्कार (Gang Rape) आणि हत्येच्या तब्बल 7 वर्षांनंतर निर्भया प्रकरणातील (Nirbhaya Case) चार दोषींना लवकरच फाशी देण्यात येणार आहे. दिल्लीतील तिहार तुरूंगामध्ये याबाबत तयारीही सुरु झाली आहे. न्यूज 18 च्या वृत्तानुसार, या आरोपींना 16 डिसेंबर 2019 रोजी फाशी देण्याची शक्यता आहे. लवकरच जेल प्रशासनाला याबाबत पत्र मिळण्याची शक्यता आहे. 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर निर्घृण सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या चार आरोपींना फाशी देण्यापूर्वी एका डमीला फाशी देण्यात आली.
याबाबत बोलताना निर्भयाचे वडील बद्रीनाथ यांनी आपल्याला या फाशीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे सांगितले आहे. पवन गुप्ता, अक्षय ठाकूर, मुकेश सिंग आणि विनय शर्मा अशी या आरोपींची नावे आहेत. फाशीसाठी विशेष दोर बिहारच्या बक्सर तुरूंगातून मागवले आहेत. आरोपींना जेल क्रमांक 3 मध्ये फाशी दिली जाण्याची शक्यता आहे. इथेच आतंकवादी अफजल गुरूला फाशी देण्यात आली होती. दरम्यान, फाशी देण्यासाठी जल्लादची आवश्यकता नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पण तरीही गरज भासल्यास उत्तर प्रदेश, महाराष्ट्र किंवा पश्चिम बंगालमधून जल्लाद बोलावला जाऊ शकतो. याबाबत उत्तर प्रदेशच्या कारागृहाकडे जल्लादची मागणीही केली गेली आहे. (हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून निर्भया निधीच्या वापरासाठी तात्काळ नियोजन करण्याचे आदेश)
2012 मध्ये निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या खटल्यातील दोषींची दया याचिका दिल्ली सरकारने फेटाळल्यानंतर, गृह मंत्रालयाला (एमएचए) पुन्हा दया याचिका मिळाली होती. आता राष्ट्रपतींनी ही दया याचिका फेटाळण्यानंतर दोषींना लवकरच फाशीची शिक्षा सुनावली जाऊ शकते. निर्भयाच्या चार आरोपींपैकी पवन नावाच्या आरोपीला मंडोलीच्या जेल क्रमांक 14 मधून, तिहारच्या जेल क्रमांक 2 मध्ये शिफ्ट करण्यात आले.