अबब ! दिवाळी बोनस म्हणून गाड्या, एफडी, दागिने आणि घरांची खैरात

गुजरातच्या सुरत येथील व्यापाऱ्यानेआपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून चक्क कार आणि एफडी गिफ्ट दिल्या आहेत

सावजी ढोलकिया कार गिफ्ट देताना (Extreme right, photo credit: YouTube)

दिवाळी आली की चाकरमान्यांना, कर्मचाऱ्यांना वेध लागतात ते दिवाळी सुट्ट्या आणि कंपनीकडून मिळणाऱ्या दिवाळी बोनसचे. आजकाल दिवाळीचा बोनस हा दिवाळीचा एक अविभाज्य घटक बनला आहे. घरात काम करण्याऱ्या कामगारांनाही दिवाळीचा बोनस द्यावा लागतो. साधारण कंपन्याकडून कामगारांना त्यांचा पूर्ण अथवा अर्धा पगार अथवा काही भेटवस्तू दिवाळी बोनस म्हणून दिला जातो. मात्र गुजरातच्या सुरत येथील व्यापाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून चक्क कार आणि एफडी गिफ्ट दिल्या आहेत. त्यामुळे या तब्बल 600 कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदाची आणि भरभराटीची जाणार यात काही शंका नाही.

‘हरे कृष्ण एक्सपोर्टचे’ चेअरमन सावजी ढोलकीया असे या व्यापाराचे नाव असून, त्यांचा हिऱ्यांचा व्यापार आहे. त्यांच्या कंपनीतून जवळपास 50 देशांमध्ये हि-यांची निर्यात केली जाते. दिवाळी आली की सावजी ढोलकिया चर्चेत येतात, कारण त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना घरेदेखील दिवाळी बोनस म्हणून दिली गेली आहेत. यावर्षी त्यांनी आपल्या 600 कर्मचाऱ्यांना कार तर 900 कर्मचाऱ्यांना एफडी भेट दिल्या आहेत. या सर्वांसाठी त्यांनी चक्क 50 करोड रुपये खर्च केला आहे.

दोन महिन्यांपूर्वी कंपनीत 25 वर्षं पूर्ण करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना मर्सिडीज बेन्झही भेट म्हणून देण्यात आली आहे. तर 2016 मध्ये आपल्या 1761 कर्मचा-यांना गाड्या, सदनिका आणि दागिने भेट म्हणून दिल्या होत्या. तसेच 2014मध्ये देखील सावजी यांनी 1300 कर्मचा-यांना गाड्या व दागिने दिवाळी बोनस म्हणून दिले होते.

कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे चीज आपण मोठे बक्षीस देऊन केले तर, कर्मचारी खुश होऊन त्यांना पुन्हा नव्याने काम करण्यास हुरूप येतो त्यामुळे साहजिकच कंपनीला त्याचा फायदा होतो. असे साधे गणित या इतक्या महागड्या दिवाळी बोनसमागे आहे, असे सावजी ढोलकीयांचे म्हणणे आहे.