Budget 2020: अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारात 10 वर्षातील सर्वात मोठी घसरण; एका दिवसात 3.46 लाख कोटी बुडाले
बजेटच्या एक दिवस आधी म्हणजे 31 जानेवारी रोजी, सेन्सेक्स निर्देशांक बीएसई वर सूचीबद्ध एकूण कंपन्यांची मार्केट कॅप 1,56,50,981.73 कोटी रुपये होती.
1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला डोळ्यासमोर ठेऊन शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी यांच्यासाठी अनेक विशेष घोषणा करण्यात आल्या. त्याचबरोबर कॉर्पोरेट क्षेत्रालाही दिलासा देण्यात आला आहे. मात्र निर्मला सीतारमण यांच्या या अर्थसंकल्पाबाबत शेअर बाजाराची (Equity Market) त्वरित प्रतिक्रिया चांगली राहिली नाही. अपेक्षा पूर्ण न झाल्याने एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे 3.46 लाख कोटी रुपये बुडाले. बजेटच्या एक दिवस आधी म्हणजे 31 जानेवारी रोजी, सेन्सेक्स निर्देशांक बीएसई वर सूचीबद्ध एकूण कंपन्यांची मार्केट कॅप 1,56,50,981.73 कोटी रुपये होती.
मात्र अर्थसंकल्पाच्या दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी बाजारातील भांडवल घसरून 1,53,04,724.97 कोटींवर आले. या अर्थाने, केवळ एका व्यावसायिक दिवसात गुंतवणूकदारांना 3.46 लाख कोटींपेक्षा जास्त तोटा झाला आहे. शनिवारी, अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्समध्ये 10 वर्षांतील सर्वात मोठी घसरण दिसून आली. व्यापार संपल्यानंतर सेन्सेक्स 987.96 अंक किंवा 2.43 टक्क्यांनी घसरून, 39,735.53 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टी 300.25 अंक किंवा 2.51 टक्क्यांनी घसरून, 11,661.85 अंकांवर आला. (हेही वाचा: Budget 2020: बजेट सादर होण्यापूर्वी सरकारला दिलासा, 1 कोटींच्या पार GST वसूल)
साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी शेअर बाजाराचा व्यापार होत नाही, परंतु यावेळी सर्वसाधारण अर्थसंकल्पामुळे बाजार खुला होता. शेअर बाजारातील घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे बजेटमधील लाभांश वितरण कर (डीडीटी) काढून टाकणे हे आहे. कंपन्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने डीडीटी काढून टाकली आहे. तसेच दीर्घ मुदतीच्या भांडवली लाभ करात सवलत मिळावी अशी बाजारपेठेची अपेक्षा होती. मात्र ती झाली नाही. त्याचबरोबर वाहन व रिअल इस्टेट क्षेत्रालाही अर्थसंकल्पात दिलासादायक बातमी मिळाली नाही, यामुळेच गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण आहे.