Shigella: शिगेला बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; उत्तर केरळमध्ये हाय अलर्ट
शिगेला संक्रमित रुग्णांमध्ये सौम्य अतिसार आणि ताप लक्षणे दिसून आली आहेत.
कोरोनाने संपूर्ण देशाला हादरून सोडले असताना आणखी एका विषाणूने डोके वर काढले आहे. केरळमधील (Kerala) कोझिकोड (Kozhikode) जिल्ह्यात शिगेला संसर्गामुळे (Shigella Infection) एका अकरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सहा जणांना शिगेला विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. जयश्री यांनी दिली आहे. शिगेला संक्रमित रुग्णांमध्ये सौम्य अतिसार आणि ताप लक्षणे दिसून आली आहेत. यामुळे केरळमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केरळमध्ये अतिसारच्या एकूण 26 रुग्णांपैकी 6 जणांना शिगेला संसर्गाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. इतर जणांनी या आजारावर मात केली आहे. परंतु, ताप असल्यामुळे दोन लहान मुलांना मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे. शिगेला हा आजार मोठ्या प्रमाणात लहान मुलांवर परिणाम करतो. व्हायरल संसर्गामध्ये लहान मुलांमध्ये अतिसारची तक्रार पाहायला मिळते. मात्र, समस्या अशी आहे की, काही आजार लहान मुलांच्या मृत्युचे कारण ठरते, असे जयश्री म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा-Coronavirus Vaccine: भारतात कोरोनावरील लस कधी उपलब्ध होणार? केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले 'हे' उत्तर
आरोग्य तज्ञाने सांगितले की हे संक्रमण फार धोकादायक नाही, परंतु जर त्याकडे दुर्लक्ष केले तर आरोग्याची स्थिती आणखीनच बिघडते आणि डिहायड्रेशन (पाण्याचा अभाव) आणि थकवा यामुळेही रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. पाण्याव्यतिरिक्त, हे जीवाणू हानीकारण खाद्यपदार्थातून देखील पसरतात.