MP Phulo Devi Collapses Inside Parliament: राज्यसभा खासदार फुलो देवी नेताम यांची प्रकृती बिघडली; संसदेत NEET पेपर लीकच्या निषेधादरम्यान पडल्या बेशुद्ध
या गदारोळात फुलो देवी यांची तब्येत बिघडली आणि त्या बेशुद्ध झाल्या. सहकारी खासदारांनी फुलो देवी यांना उचलले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले. फुलो देवी यांना संसदेच्या संकुलातून रुग्णालयात नेण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
MP Phulo Devi Collapses Inside Parliament: संसदेच्या अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी राज्यसभेत काँग्रेस खासदार फुलो देवी नेताम (MP Phulo Devi Netam) यांची प्रकृती खालावल्याची बातमी समोर आली आहे. फुलो देवी (Phulo Devi) यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. NEET परीक्षेतील गैरप्रकारांबाबत विरोधी पक्ष सभागृहात निदर्शने करत असताना ही घटना घडली. या गदारोळात फुलो देवी यांची तब्येत बिघडली आणि त्या बेशुद्ध झाल्या. सहकारी खासदारांनी फुलो देवी यांना उचलले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले. फुलो देवी यांना संसदेच्या संकुलातून रुग्णालयात नेण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
राज्यसभा खासदार फुलो देवी नेताम यांना आरएमएल रुग्णालयात नेण्यात आले आहे. फुलो देवी बेशुद्ध पडल्यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजूही तेथे पोहोचले. रजनी पाटील, स्वाती मालीवाल, इम्रान प्रतापगढ़ी आणि इतर काँग्रेस खासदारांनीही फुलो देवींना मदत केली. (हेही वाचा -Parliament Session 2024: नीट परीक्षा घोटाळ्यावरुन संसदेत विरोधक आक्रमक; लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित)
पहा व्हिडिओ -
कोण आहेत फुलो देवी नेताम?
फुलो देवी नेताम या छत्तीसगडमधील बस्तर भागातील कोंडागाव येथील रहिवासी असून त्या काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार आहेत. छत्तीसगडमध्ये त्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षाही आहेत. 14 सप्टेंबर 2020 रोजी त्या छत्तीसगडमधून काँग्रेसच्या सदस्या म्हणून राज्यसभेवर निवडून आल्या. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, राज्यसभेच्या विशेषाधिकार समितीने फुलो देवी नेताम यांच्यासह 12 विरोधी खासदारांना सदनाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल गैरवर्तणूक केल्याबद्दल दोषी धरले होते. गुरुवारी या सदस्यांना भविष्यात असे वर्तन न करण्याचा इशारा देण्यात आला.
तथापी, आप नेते संजय सिंह, शक्तीसिंह गोहिल, सुशील कुमार गुप्ता, संदीप कुमार पाठक, सय्यद नासिर हुसेन, फुलो देवी नेताम, जेबी माथेर हिशाम, रंजीत रंजन आणि इम्रान प्रतापगढ़ी यांना भविष्यात अशा गैरवर्तनात सहभागी होण्यापासून रोखले पाहिजे, असे समितीने अहवालात म्हटले आहे.