Coronavirus Lockdown: 21 दिवसांच्या लॉकडाऊननंतर भारतीय रेल्वे सेवा 15 एप्रिल पासून सुरू होणार
त्यामुळे देशातील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, 21 दिवसांच्या लॉकडाऊननंतर म्हणजेच 15 एप्रिलपासून सर्व रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.
Coronavirus Lockdown: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले होते. त्यामुळे देशातील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, 21 दिवसांच्या लॉकडाऊननंतर म्हणजेच 15 एप्रिलपासून सर्व रेल्वे सेवा (Train Service) पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे विभागाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना 15 एप्रिलपर्यंत पदावर रुजू होण्यास सांगितले आहे. सरकारने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर रेल्वे सेवा सुरू करण्यात येईल, असेही रेल्वे विभागाने स्पष्ट केलं आहे. (हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला अटल बिहारी वाजपेयी यांचा 'आयो दीयां जलाएं' कवितेचा खास व्हिडिओ (Watch Video))
दरम्यान, रेल्वेने 15 एप्रिलनंतर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या आणि जागेची उपलब्धता यासंदर्भातील वेळापत्रक तयार केले आहे. त्यासाठी देशातील 17 झोनला रेल्वे चालविण्यासाठी सज्ज राहण्याचा संदेश पाठवण्यात आला आहे. 15 एप्रिलपासून जवळपास 80 टक्के गाड्या धावण्याची शक्यता असून त्यामध्ये राजधानी, शताब्दी, दुरंतो या गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय लोकल रेल्वे गाड्यांची सेवाही सुरू होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर रेल्वेने 13,523 गाड्यांची सेवा 21 दिवसांसाठी थांबविली होती. त्यानंतर सरकारच्या आदेशावरून केवळ जीवनावश्यक वस्तू तसेच वैद्यकिय सेवा पुरवण्यासाठी पार्सल गाड्यांची सेवा सुरू करण्यात आली होती.