IPL Auction 2025 Live

NewsClick च्या माजी कर्मचाऱ्याच्या केरळमधील निवासस्थानावर छापा; दिल्ली पोलिसांकडून फोन आणि लॅपटॉप जप्त

दिल्ली पोलिसांच्या तीन सदस्यीय पथकाने त्यांचा जबाब नोंदवला आहे. पॉल यांनी पत्रकारांना सांगितले की न्यूजक्लिक आणि सीपीआय(एम) यांच्याशी संबंध असल्याबद्दल त्यांची चौकशी करण्यात आली.

Delhi Police (PC - Facebook)

Delhi: दिल्ली पोलिसांनी (Delhi Police)  शुक्रवारी केरळ शहरातील कोडुमोनजवळील न्यूजक्लिकच्या (NewsClick) माजी कर्मचारी अनुषा पॉल (Anusha Paul) च्या घरावर छापा टाकला. दिल्ली पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून पॉलचा लॅपटॉप आणि फोन जप्त केला आहे. दिल्ली पोलिसांच्या तीन सदस्यीय पथकाने त्यांचा जबाब नोंदवला आहे. पॉल यांनी पत्रकारांना सांगितले की न्यूजक्लिक आणि सीपीआय(एम) यांच्याशी संबंध असल्याबद्दल त्यांची चौकशी करण्यात आली.

पॉल यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनी त्यांना शेतकऱ्यांच्या निषेध, एनआरसी-सीएए निषेध किंवा केंद्राच्या कोविड -19 व्यवस्थापनाबद्दलच्या अहवालाबद्दल प्रश्न विचारले. पॉल यांनी पुढे बोलताना म्हटलं की, नरेंद्र मोदी सरकार आणि आरएसएसच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या संघटना आणि कर्मचाऱ्यांना धमकावण्याचा हा कट आहे. दिल्ली पोलिसांनी मला सीपीआय(एम) दिल्लीचे राज्य सचिव केएम तिवारी यांना ओळखते का? असा प्रश्न विचारला. अर्थात मी त्याला ओळखत असल्याचं मी त्यांना सांगितलं. ते सीपीआय(एम) चे राज्य सचिव आहेत. मी सीपीआय(एम) कार्यकर्ता आहे. मी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) च्या दिल्ली युनिटचा राज्य समिती सदस्य आणि तिचा राज्य कोषाध्यक्ष आहे. (हेही वाचा - Delhi Police Raids Newsclick Office: दिल्ली पोलिसांकडून न्यूजक्लिक वेबसाईट निधी प्रकरणी छापेमारी; अभिसार शर्मा, अनिंद्यो चक्रवर्ती यांच्याह अनेक पत्रकारांच्या घरावर छापे)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने न्यूजक्लिकचे संस्थापक आणि मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि मानव संसाधन विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांना मंगळवारी (3 ऑक्टोबर) संध्याकाळी अटक केली. एकूण 46 पत्रकार आणि ऑनलाइन न्यूज पोर्टलवर योगदान देणाऱ्यांची चौकशी करण्यात आली. तसेच त्यांचे मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट जप्त करण्यात आले.

न्यूजक्लिकवर भारताची सुरक्षा आणि अखंडता धोक्यात आणण्याचा कट आणि चीनकडून बेकायदेशीर निधी घेतल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी यूएपीए अंतर्गत न्यूजक्लिक विरोधात एफआयआर नोंदवला आहे.