Anna Sebastian Perayil Death: राहुल गांधी यांनी मृत तरूणीच्या पालकांशी साधला संवाद, न्याय मिळवून देण्यासाठी लढण्याचे दिले आश्वासन

या मृत्यूमुळे देशभरात संतापाचे वातावरण पहायला मिळत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी मृत तरुणीच्या पालकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यात त्यांनी तरूणीला न्याय मिळवून देण्यासाठी लढणार असल्याचे आश्वासन दिले.

Rahul Gandhi (PC -X/@shaandelhite)

Anna Sebastian Perayil’s Death: अर्न्स्ट अँड यंग (EY) कंपनीच्या 26 वर्षीय महिला कर्मचाऱ्याचा(EY Employee Death) कामाच्या तणावामुळे मृत्यू झाला. या मृत्यूमुळे देशभरात संतापाचे वातावरण पहायला मिळत आहे. तरूणीच्या मृत्यूबद्दल देशभरात गदारोळ होत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी तिच्या पालकांशी संवाद साधला आणि तरूणीला न्याय मिळवून देण्यासाठी लढणार असल्याचे आश्वासन दिले. कॉर्पोरेट कार्यालयांमधील घातक कार्यसंस्कृती कमी करण्यासाठी काम करण्याची शपथही राहूल गांधी यांनी दिली.

विरोधी पक्षनेता या नात्याने मी वैयक्तिकरित्या लढा देईन, असे आश्वासनही राहूल गांधी यांनी दिले. अॅना सेबॅस्टियन पेरायल ही केरळमधील तरूणी चार्टर्ड अकाउंटंट (CA) म्हणून अर्न्स्ट अँड यंग कंपनीत गेल्या ४ महिन्यांपूर्वी रुजू झाली होती. मात्र, जुलैमध्ये कामाच्या तीव्र दबावामुळे तिच्या प्रकृतीत बिघाड झाला आणि तिचा मृत्यू झाला. (हेही वाचा: EY Pune: कामाचा ताण, नव्या नोकरीत अवघ्या 4 महिन्यात चार्टर्ड अकाउंटंट तरुणीचा मृत्यू; आईचे कंपनीवर गंभीर आरोपांचे पत्र)

तिची आई, अनिता ऑगस्टिन यांनी EY इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमाणी यांना पत्र लिहिले, त्यांच्या कंपनीत कामाचा दबाव आणि त्यामुळे त्यांच्या मुलीचा झालेला मृत्यू यांच्या सविस्तर घटना त्यांनी लिहिलेल्या पत्रात मांडल्या. त्यावर राहुल यांनी एआयपीसीला भारतातील सर्व कार्यरत व्यावसायिकांसाठी अण्णांच्या स्मरणार्थ जागरुकता चळवळ निर्माण करण्याचे निर्देश दिले,

कामाचा ताण आणि घातक कार्यसंस्कृतीशी संबंधित समस्यांबद्दल कॉर्पोरेट व्यावसायिकांकडून फीडबॅक घेण्यासाठी राहुल यांनी हेल्पलाइन सुरू करण्याच्या सूचना दिल्याची माहितीही त्यांनी दिली. AIPC लवकरच कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी चांगल्या कामाच्या परिस्थितीसाठी मसुदा मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. तत्पूर्वी, काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी 40 तासांच्या कामाचा आठवडा सुचवला आहे. त्याबाबत ते लवकरच संसदेत प्रस्ताव मांडणार असल्याचे म्हटले आहे.