राहुल गांधी यांच्या संपत्तीवर शंका; 2004 मध्ये 55 लाख, तर 2014 मध्ये 9 कोटी कशी? : रविशंकर प्रसाद

फक्त खासदार असलेल्या राहुल गांधी यांची संपत्ती 2004 मध्ये 55 लाख होती, तर 2014 मध्ये ती 9 कोटींवर कशी काय गेली? असा प्रश्न रविशंकर यांनी विचारला आहे

Ravi Shankar Prasad and Congress president Rahul Gandhi. (Photo Credits: File Photo)

केंद्रीय कायदा व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यावेळी  रविशंकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उत्पन्नाविषयी प्रश्न उपस्थित केले. एक फक्त खासदार असलेल्या राहुल गांधी यांची संपत्ती 2004 मध्ये 55 लाख होती, तर 2014 मध्ये ती 9 कोटींवर कशी काय गेली? असा प्रश्न रविशंकर यांनी विचारला आहे. राहुल गांधी यांच्या उत्पन्नाचे साधन काय आहे? हे त्यांनी देशाला, जनतेला सांगावे असेही रविशंकर म्हणाले आहेत.

यावेळी रविशंकर म्हणाले, ‘राहुल गांधी संसदेचे सदस्य आहेत, त्यांचा उत्पन्नाचा स्त्रोत हे त्यांचे वेतन आहे, दुसरा कोणताही स्पष्ट स्रोत नाही. 2004 निवडणुकांमध्ये राहुल गांधींनी 55,38,123 रुपये संपत्ती जाहीर केली होती, त्यानंतर त्यांनी 2009 निवडणुकांमध्ये 2 कोटी रुपये संपत्ती जाहीर केली होती, तर 2014 निवडणुकांमध्ये त्यांनी 9 कोटी संपत्ती जाहीर केली होती. इतक्या वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीत अशी वाढ झालीच कशी?’ (हेही वाचा: राहुल गांधी करणार दुहेरी उमेदवारी; उत्तर प्रदेश राज्यातील अमेठीसह केरळमधील वायनाड येथून लढणार निवडणूक)

यावेळी रविशंकर यांनी उपहासादाखल रॉबर्ट वाड्रा यांचे उदाहरण दिले. जिथे तुम्ही काही लाख गुंतवता आणि दुसरीकडून तुम्हाला अनेक कोटींचा फायदा होता. दरम्यान काल भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांना तब्बल 1800 कोटींची लाच दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समोर येऊन स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे.