उत्तर प्रदेश पोलिसांनी माझा गळा दाबला आणि मला धक्का देऊन पाडण्याचा प्रयत्न केला; प्रियांका गांधी यांचा आरोप
उत्तर प्रदेश पोलिसांनी 'माझा गळा दाबला आणि मला धक्का देऊन पाडण्याचा प्रयत्न केला,' असा गंभीर आरोप काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी केला आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी 'माझा गळा दाबला आणि मला धक्का देऊन पाडण्याचा प्रयत्न केला,' असा गंभीर आरोप काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी (Congress General Secretary Priyanka Gandhi) यांनी केला आहे. प्रियंका गांधी लखनऊमध्ये 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. नागरिकत्व संशोधन कायद्याचा विरोध करणाऱ्या माजी आयपीएस अधिकारी एस. आर. दारापुरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी प्रियांका जात होत्या. परंतु, लखनऊ पोलिसांनी प्रियंका गांधी यांचा ताफा अडवला. त्यानंतर प्रियंका गांधी यांनी चालत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पोलिसांनी प्रियंका यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर पोलिसांनी माघार घेत प्रियंका गांधी यांना एस. आर. दारापुरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास परवानगी दिली. यावेळी प्रियंका गांधी एका दुचाकीवरुन एस. आर. दारापुरी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेल्या.
दरम्यान, प्रियंका गांधी यांनी याबाबत माध्यमाशी बोलताना सांगितले की, 'आम्हाला रस्त्यावर अडवण्याला काही अर्थ नाही. हे प्रकरण एसपीजीचं नाही. ते उत्तर प्रदेश पोलिसांच्या अखत्यारित येतं. पोलिसांनी माझा गळा दाबला आणि मला धक्का देऊन पाडण्याचा प्रयत्न केला,' असा गंभीर आरोपही प्रियांका गांधी यांनी केला आहे. माझ्यासोबत पोलिसांनी गैरव्यवहार केला. या सर्व प्रकारानंतर मी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह स्कूटीवर बसून जाऊ लागले. तेव्हादेखील पोलिसांनी मला पुन्हा अडवले, असंही प्रियंका यांनी यावेळी सांगितलं आहे. (हेही वाचा - महाराष्ट्र, झारखंडमध्ये सरकार गमावल्यानंतर दिल्ली निवडणुकीपूर्वीच भाजप तयारीत)
पोलिसांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करताना झालेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी माजी आयपीएस एस. आर. दारापुरी आणि काँग्रेस प्रवक्ता सदफ जफर यांनी अटक केली आहे. आज देशात विविध ठिकाणीनागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधात 'भारत बचाओ-संविधान बचाओ' अशी घोषणा देत 'फ्लॅग मार्च'काढण्यात आला.