तुरुंगातील कैद्यांची चंगळ : जेवणासाठी मिळणार पावभाजी, पुरी, छोले भटुरे, खीर यांसारखे पदार्थ

नवीन वर्षाच्या मुहूर्तावर प्रशासनाने हे पदार्थ कैद्यांना द्यायला सुरुवात केला आहे.

पाव भाजी आणि छोले भटुरे (संग्रहित - संपादित प्रतिमा)

तुरुंगातील जीवन हे आपण फक्त मोठ्या आणि छोट्या पडद्यावरच पहिले आहे. तुरुंगातील कैद्यांचे आयुष्य, त्यांचे राहणीमान, त्यांचे जीवन याची आपण आपल्या जीवनात कल्पनाही करू शकत नाही. तुरुंगातील जेवण म्हटल्यावर नेहमीच आपल्या डोळ्यासमोर कडक भाकरी अथवा चपाती, पातळ आमटी, कशीतरी बनवलेली सुकी भाजी अशीच चित्रे येतात. काही अंशी त्यात तथ्यही असेल. मात्र आता अशा जेवणाऐवजी तिहार तुरुंगा (Tihar Jail) मधील कैद्यांना मिळणार आहेत पावभाजी, बदामी पुरी, छोले भटुरे, खीर, मलाईचाप यांसारखे अनेक चविष्ट पदार्थ. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर प्रशासनाने हे पदार्थ कैद्यांना द्यायला सुरुवात केला आहे.

गेली काही वर्षे कैद्यांना मिळणाऱ्या जेवणाविषयी अनेक तक्रारी येत होत्या. कैद्यांना निकृष्ट पद्धतीचे जेवण दिले जात आहे याबाबत अनेकवेळा आवाज उठवला गेला होता. या तक्रारींचा विचार करीत प्रशासनाने कैद्यांना मिळणाऱ्या जेवणामध्ये बदल केला आहे. तसेच याआधी कैद्यांना नाष्ट्याच्या नावाखाली चहा आणि फक्त दोन बिस्किटे दिली जायची, मात्र आता त्याऐवजी कैद्यांना पोटभर नाष्टा दिला जाणार आहे.

एक जानेवारीपासून कैद्यांना हे नवीन जेवण द्यायला सुरुवात केली आहे. याबाबत कैदी अत्यंत समाधानी असून, त्यांना हे जेवण आवडल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचसोबत कैद्यांना मिळणाऱ्या जेवणाचा मेन्यू हा आधीच ठरवला जाणार आहे. ज्यामध्ये आता आठवड्यातून दोन दिवस खिरीचाही समावेश केला गेला आहे. याचबरोबर आता तिहार, मंडोली आणि रोहिणी जेल मध्ये 120 करोड रुपये खर्चून सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत, ज्याद्वारे कैद्यांवर लक्ष ठेवण्यात येईल.