Goa Assembly Election 2022: गोव्यातील उमेदवारांची यादी 'या' तारखेला जाहीर करणार - संजय राऊत
संजय राऊत यांनी गोव्यातील शिवसेना उमेदवारांची यादी 18 आणि 19 तारखेला जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी गोव्यातील शिवसेना उमेदवारांची यादी 18 आणि 19 तारखेला जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, राऊत यांनी आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्षावर टीका केली. गोव्यातील राजकारण हे प्रस्थापितांच्या हाती गेलं आहे. गोव्यात भूमाफिया, भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफिया यांच्या हातात राजकारणाची सूत्रं आहेत. हे लोक गोव्याचं भविष्य ठरवतात. हा प्रकार थांबवायचा असेल, तर गोव्यातील जनतेने आपल्यातील सामान्य लोकांना मतदान करावं आणि त्यांना निवडून आणावं. या प्रकाराचा अवलंब बाळासाहेब ठाकरे यांनी देखील केला होता. बाळासाहेबांनी सामान्यातील सामान्य माणसाला उमेदवारी देऊन आमदार, खासदार आणि मंत्री पद दिलं होतं. गोव्यात या पद्धतीचा अवलंब होणं गरजेचं आहे. यासाठी शिवसेना प्रयत्न करील, अशी भूमिकादेखील यावेळी संजय राऊत यांनी स्पष्ट केली.
दरम्यान, येत्या काही दिवसांत पाच राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गोव्यातील निवडणुकीवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाराष्ट्रात आघाडी आहे. काँग्रेसदेखील आमच्यासोबत आहे. मात्र, गोव्यात त्यांची जागा वाटपासंदर्भात मजबुरी असेल. काँग्रेस सोबत जागा वाटप नीट होऊ शकलं नाही. परंतु, आम्ही निवडणूक लढणार आहोत. येत्या 18 किंवा 19 तारखेला मी गोव्यात जाणार आहे. यावेळी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर करू, असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.
संजय राऊत यांनी यावेळी आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले की, तृणमूल काँग्रेस मनाने सत्तेत आलेली आहे. आम आदमी पार्टीचीही परिस्थिती तशीच आहे. त्यांना केवळ शपथ घेणंच बाकी आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री शनिवारी गोव्यात दारोदारी प्रचार करत होते. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तरीदेखील ते दारोदारी जात आहेत. आपल्या पक्षाचा प्रचार करणं चांगली गोष्ट आहे. परंतु, गोव्यातील राजकारणात नेमकी काय होतयं ते सर्वांना काही दिवसात समजेलचं, असंही राऊत यावेळी म्हणाले.