Rupali Patil Quits MNS: मनसे राजीनाम्यानंतर रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया; हा निर्णय वैयक्तिकरित्या घेतला आहे, कोणत्या पक्षात जाणार हे लवकरच सांगेल
तसेच मी १४ वर्षे काम करत असताना संघर्ष कसा करायचा या पक्षातून मी शिकले आहे. कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप ठरवलेले नाही.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं (MNS) कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) देखील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुढील दोन दिवस राज ठाकरे (Raj Thackeray) पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर (Pune Visit) आहेत. मात्र, राज ठाकरे पुण्यात येत असताना काही तासा आधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वीही त्यांनी एका मुलाखतीत पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. मात्र, आज त्यांनी मनसे नेते अनिल शिदोरे (Anil Shidore) यांच्याकडे आज आपला राजीनामा दिला आहे. दरम्यान, रुपाली पाटील लवकरच नवीन पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा पाटील यांनी केली नाही. दरम्यान, रुपाली पाटील ठोंबरे यांनी आज पत्रकार परिषद घेवुन माध्यमांशी संवाद साधला आणि आपली पुढील भुमिका स्पष्ट केली.
मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णयावर सांगताना त्यांनी कोणातही बदल घडत नसल्यास स्वत: मध्ये बदल घडवावेत असे सूचक वक्तव्य रुपाली पाटील यांनी केले. तसेच मी 14 वर्षे काम करत असताना संघर्ष कसा करायचा या पक्षातून मी शिकले आहे. कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप ठरवलेले नाही. लवकच निर्णय मी जाहीर करेल,” असे रुपाली पाटील म्हणाल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही. ती माझी वृत्ती नसल्याचे पाटील यांनी सांगितले. राजीनामा देण्याआधी माझ्या मनातील खदखद राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवली आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे राजीनामा दिला असल्याची कबुली त्यांनी दिली. (हे ही वाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केल्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी केले 'हे' ट्वीट.)
काल मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत माझी भेट झाली. त्यानंतर वरुण देसाई यांच्यासोबतही माझी भेट झाली. ती सदिच्छा भेट होती. त्यानंतर मी राजीनामा दिली आहे,” असे रुपाली पाटील म्हणाल्या.तसेच ज्या पद्धतीने मी करत होते त्यापद्धतीने मला राष्ट्रवादी आणि शिवसेनेने स्विकारले तरच मी जाणार आहे. सध्या दोन पर्याय आहे तिसरा पर्याय आला तर सांगेन, अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी दिली.
कोण आहेत रुपाली पाटील-ठोंबरे?
रुपाली पाटील या पुण्यातील मनसेच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. तसेच तरुणांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी आतापर्यंत पुण्यात अनेक आंदोलनं उभारली होती. त्यामुळेच त्यांची तरुण वर्गात अधिकच क्रेझ होती. रुपाली पाटील अनेकदा महिलांचे प्रश्न मांडताना दिसायच्या. तसेच त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे.
रुपाली पाटील यांनी पुणे महापालिकेत नगरसेवक पदही भूषवलं आहे. मनसेमध्ये त्यांच्यावर विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. याशिवाय मनसे महिला शहराध्यक्ष पदही त्यांना देण्यात आलं होतं. तर पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक देखील त्यांनी लढवली होती.