विधान परिषद निवडणूक केवळ निमित्त; खडसे, मुंडे, तावडेंचा पत्ता कापून देवेंद्र फडणवीस आणि भाजपची नवी रणनिती
त्यासाठी येणारे अडथळे, जनाधार असलेले नेत्यांचे खच्चीकरण करणे जणू क्रमप्राप्तच. त्यामळे देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षा किती मोठी आणि त्याचा पक्ष संघटनेला फायदा किती होतो, यावर भाजप आणि फडणवीसांचे भविष्यातील राजकाण अवलंबून असणार आहे.
Maharashtra Legislative Council Election 2020: कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन या कात्रीत लटकलेली विधान परिषद निवडणूक अखेर जाहीर झाली. एकूण 9 जागांसाठी नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्षाने मोठ्या उत्साहात उमेदवारांची यादीही जाहीर केली. या यादीत प्रविण दटके (Pravin Datke), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), अजित गोपछडे (Ajit Gopchade) आणि रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांना उमेदवारी देण्यात आली. महत्त्वाचे असे की मताधिक्याचा विचार करता भाजपच्या वाट्याला येणाऱ्या या 4 जागा सुरक्षीत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तिकीट कापले गेलेल्या किंवा पराभूत झालेल्या भाजपच्या ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. ती गैर नव्हती. प्रत्यक्षात मात्र तसे घडले नाही. एकनाथ खडसे (Eknath Khadse), पंकजा मुंडे (Pankaja Munde), विनोद तावडे (Vinod Tawde), चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) या नेत्यांना उमेदवारी मिळाली नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश भाजपने या सर्वांचा पत्ता कट केला. असे का घडले असावे?
भाजपच्या मनात स्वप्नभंग झाल्याची सल
केवळ एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनाच नव्हे तर प्रसारमाध्यमांतून भारतीय जनता पक्षाची बाजू मोठ्या प्रभावीपणे मांडणारे भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते माधव भंडारी, केशव उपाध्ये आणि त्यांच्यासारख्या इतरही अनेक मंडळींना भाजपने डावलले आहे. त्यामुळे भाजपचा नेमका विचार, रणनिती तरी काय? असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2019 भारतीय जनता पक्षाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली. भाजपचे 105 उमेदवार निवडूण आले. मात्र, अतिमहत्त्वाकांक्षेमुळे शिवसेना सोबत घेऊन सत्तासोपान चढण्याचे भाजप आणि देवेंद्र फडणवीस मंडळींचा स्वप्नभंग झाला. याची सल देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपा आणि केंद्रीय भाजप नेतृत्वाला नक्कीच आहे.
शरद पवार यांचा धोबीपछाड
सर्वाधिक 105 आमदार निवडूण येऊनही भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. भाजपचे चाणक्य अमित शाह ते महाराष्ट्रातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मंडळीला शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या रुपात धोबीपछाड दिला. लोकसभा निवडणूक 2014 पासून भारतीय जनता पक्ष मोठ्या वेगाने राजकीय घोडदौड करतो आहे. प्रचाराचे आणि राजकारणाचे नवनवे फंडे वापरत भाजपचा विजयवारु चौखूर उधळत आहे. अशा या चौखूर उधळलेल्या भाजपच्या वारुला शरद पवार यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या रुपात महाविकास आघाडी स्थापन करुन लगाम लावला. राजकीय वर्तुळात शरद पवार यांच्या या प्रयोगाची भारतभर चर्चा झाली. भाजपला रोखता येऊ शकते हा संदेश या निमित्ताने देशभर गेला. इथेच नेमकी मेख आहे. (हेही वाचा, Maharashtra Legislative Council Election 2020: भाजप उमेदवार प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांची राजकीय कारकीर्द)
भाजपची रणनिती
राजकारणात रणनिती आखणे आणि महत्त्वाकांक्षा बाळगणे कधीच गैर नसते. त्यामुळे मित्रपक्ष आणि विरोधीपक्षांना लगाम लावण्यासाठी सर्वच पक्ष रणनिती आखत असतात. जी विधानसभा, लोकसभा, राज्यसभा आणि विधान परिषदेसह देशभरात होणाऱ्या विविध निवडणुकांमधून दिसते. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2020 मध्ये एकूण 9 पैकी 4 जागांच्या निमित्ताने भाजपने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेकांचा पत्ता कापला. याचे अनेकांना मोठे आश्चर्य वाटले. पण, याकडे रणनिती म्हणून पाहिल्यास काहीही चुकीचे नाही.
विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजप-शिवसेना युतीचा प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादीने उतरवलेले उमेदवार पाहा. अपवाद वगळता राष्ट्रवादीचे बहुतांश उमेदवार हे तरुण आहेत. तसेच नवे चेहरे आहेत. त्यामुळे अशा तरुण नेत्यांच्या पक्षाला शह द्यायचा तर आपल्याकडेही तरुण नेतृत्वच असायला हवे अशी रणनिती ठरु शकते. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा विचार करता इथेही तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विरोधकांचे आव्हान भविष्यात पेलायचे अथवा रोखून धरायचे तर त्याची पेरणी आतापासूनच करायला हवी. त्यासाठी भाजपही आतापासूनच नव्या चेहऱ्यांच्या शोधात आहे. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेला आहे. त्यामुळे हा पक्ष कधीही तत्कालीन रणनिती आखत नाही असे म्हणतात. त्या दृष्टीने विचार केल्यास ज्येष्ठांची सद्दी संपवून तरुणांचा नवा प्रवाह पक्षात आणावा असेच काहीसे भाजपचे धोरण दिसते. त्यामळे वेळ आल्यास ज्येष्ठांना डावललेही जाऊ शकते. तसेही ज्येष्ठांना डावलने भाजपमध्ये नवे नाही. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, अरुण शौरी, यशवंत सिन्हा, सुमित्रा महाजन यांची नावे आपण जाणताच. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे ही तर केवळ लिटमस टेस्ट ठरु शकते. (हेही वाचा, Maharashtra Legislative Council Elections 2020: महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीसाठी भाजपने जाहीर केली उमेदवार यादी; एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना वगळलं)
फडणवीस यांची महत्त्वकांक्षा
देवेंद्र फडणवीस हा एक भाजपचा उमदा चेहरा. तरुण, तडफदार. राजकारणातील वयाच्या दृष्टीने विचार करता एकदम तरुण. देवेंद्र फडणवीस यांनाही त्याची जाण आहे. त्यामुळे आपल्याला राजकारणात चांगले भविष्य असू शकते हे फडणवीस ओळखून नसतील तरच नवल. मात्र, संघटनात्मक पातळीवर विचार करता फडणवीस यांचा स्वत:चा असा प्रभावी गट नाही. विधान परिषदेच्या निमित्ताने हो गट बाधण्यास फडणवीस यांनी सुरुत केली असे म्हणायला हरकत नाही. कारण विधानपरिषदेसाठी प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते पाटील या उमेदवारांची नावे पाहता हे सर्व उमेदवार एकतर फडणवीस यांनी भाजपत आणले आहेत किंवा ते स्वत: फडणवीस यांच्या जवळचे आहेत. आपल्या पाठीमागे आमदारांचे खासदारांचे पाटबळ नसेल तर केवळ पक्षाच्या जीवावर राजकारण करणे सोपे नसते. पक्षाच्या जीवावर एखादे मंत्रीपद, राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळू शकते. पण, काम करताना मर्यादा येतात. फडणवीस यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात ते अनेकदा दिसूनही आले.
महत्त्वाचे असे की, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यापासून विविध राज्यांच्या अनेक आजी-माजी मुख्यमंत्र्यांना केंद्रात नेतृत्व करण्याची महत्त्वकांक्षा खुणावू लागली आहे. यातील काहींची महत्त्वाकांक्षा उघड आहे. काहींची छुपी. वयाने आणि कर्तबगारीने साथ दिल्यास भविष्यात आपल्यालाही केंद्रात महत्त्वाची जबाबदारी सांभाळ्याची संधी मिळू शकते. त्यासाठी आतापासूनच पक्षीय संघटनेवर आपली पकड मजबूत करणे महत्त्वाचे. त्यासाठी येणारे अडथळे, जनाधार असलेले नेत्यांचे खच्चीकरण करणे जणू क्रमप्राप्तच. त्यामळे देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षा किती मोठी आणि त्याचा पक्ष संघटनेला फायदा किती होतो, यावर भाजप आणि फडणवीसांचे भविष्यातील राजकाण अवलंबून असणार आहे.