करुणा मुंडेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा, गरज भासल्यास परळीतून धनंजय मुंडेंविरुद्ध निवडणूक लढणार

तसेच वेळ पडली तर मी परळी मतदारसंघातून माझ्या पती विरुद्ध उभे राहण्यासही मागेपुढे पाहणार नाही. असे त्यांनी पत्रकार परिषद घेवुन म्हटले आहे.

Karuna Munde (Photo Credit -FB)

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पत्नी करुना मुंडे (Karuna Munde) यांनी आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे. शुक्रवारी अहमदनगर शहरात त्यांच्या नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली आहे. शिवशक्ती सेना (Shivshakti Sena) असे त्यांच्या पक्षाचे नाव असून 30 जानेवारीला अहमदनगरमध्ये लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा करुणा मुंडे यांनी केली आहे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आणि गोरगरीब अन्याय दूर करण्यासाठी या पक्षाची स्थापना करीत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पंचवीस वर्षापासून मी अनेक यातना सहन केल्या आहेत. त्यामुळे आता घराबाहेर पडून पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, माझ्या पक्षात सर्वसामान्य जनतेला स्थान असेल. तसेच वेळ पडली तर मी परळी मतदारसंघातून माझ्या पती विरुद्ध उभे राहण्यासही मागेपुढे पाहणार नाही. असे त्यांनी पत्रकार परिषद घेवुन म्हटले आहे.

अहमदनगर शहरात या नव्या पक्षाची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुळजाभवानी मंदिराचे दर्शन घेऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर करुणा मुंडे निघणार आहेत. काही मंत्र्यांच्या बायकांनी सुद्धा माझ्याशी संपर्क केला असून त्यांनी माझ्या पक्ष स्थापनेला पाठिंबा दिला असल्याचा गौप्यस्फोट मुंडे यांनी केला आहे. (हे ही वाचा Sanjay Raut on BJP: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधणाऱ्या भाजप नेत्याना संजय राऊत यांचा सवाल, 'पंतप्रधान तंदुरुस्त तरीही संसदेत का येत नाहीत?'.)

करुणा मुंडे पुढे म्हणाले की, 'मी हा पक्ष जनतेकडून देणगी गोळा करून सुरू करणार आहे. या पक्षात समाजसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्थान असेल. समाजकारण करताना मला सत्तेत असणं गरजेचं वाटलं. त्यामुळे मी स्वतःचा पक्ष स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. घरात आपण राजकारण पाहिलं आहे. पोलिसांचा वापर कसा होतो मी पाहिलं आहे. सध्या तीन पक्षांचे सरकार आहे. फक्त पोलिसांना बळी दिलं जातं आहे. याची उदाहरणे परमवीर सिंह, वानखेडे यांना भोगावे लागले आहेत. समीर वानखेडे सारख्या अधिकाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे.

दुसरीकडे अजित पवार, धनंजय मुंडे यांच्याकडे करोडो रुपयांची मालमत्ता असल्याचं बोललं जातं, त्यांच्याबद्दल काहीच होत नाही. त्यामुळे आता मी माझे जीवन जनसेवेसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जनतेला आवाहन आहे की एकत्र या, मी एक नवी सुरुवात करत आहे. चांगल्या लोकांचा पक्ष काढू, यामध्ये माझ्या पतीलासुद्धा स्थान देणार नाही,' असंही त्यांनी सांगितलं.