Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार, महाराष्ट्रात 105 वर्षीय काविबाईंनी बजावला मतदानाचा अधिकार (See Photo)
देशभरातील ज्येष्ठ नागरिकांनी मतदानासाठी उत्साह दर्शवला.
लोकसभा निवडणूक 2019 (Loksabha Elections 2019) च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान नुकतंच पार पडलं. देशभरातील 13 राज्यांमधील 95 मतदार संघातून 18 एप्रिलला मतदान घेण्यात आलं, या प्रक्रियेत देशातील ज्येष्ठ नागरिकांचा उत्साही समावेश वैशिष्ठ्य ठरला. पहिल्या टप्प्यातील निवडणूकांप्रमाणे या वेळेसही आरोग्याच्या तक्रारींना बाजूला ठेवत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी केली होती. या पूर्वी 107 वर्षीय सुमित्रा राय या सिक्कीमच्या, पोक्लोक कामरंग मतदारसंघातून मतदान करून सर्वाधिक वयाच्या मतदार ठरल्या होत्या.
पहिल्या टप्प्यात, महाराष्ट्रातील गोंदि विभागात 92 वर्षीय डॉ. डी.एन संघवी यांनी आपल्या 60 वर्षीय मुलाच्या सोबतीने जाऊन मतदान केलं व सोबतच तरुणांना देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन केले होते. याच आदर्शाला पुढे नेत दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील काविबाई कांबळे या 105 वर्ष वयाच्या महिलेने देखील आपल्या कुटुंबासमवेत मतदान करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
निवडणुकांच्या या रणसंग्रामात आपल्या मतदानाच्या हक्काचा योग्य वापर करणाऱ्या अशाच कर्तव्यदक्ष ज्येष्ठ नागरिकांविषयी जाणून घेऊयात. Lok Sabha Election 2019: महाराष्ट्रात अपंग मतदारांसाठी घरपोच सेवेसह विशेष सुविधा उपलब्ध; जाणून घ्या अपंग मतदारांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा
काविबाई कांबळे, (105 वर्षे)
लातूर मतदार संघातील हरंगुल बुद्रुकच्या मतदान केंद्रावर आलेल्या काविबाई कांबळे या १०५ वर्षाच्या आहेत. वयोमानामुळे नीट चालताही येत नसलेल्या कावीबाईनी कुटुंबाच्या मदतीने मतदान केंद्रावर पोहचून मतदान केले.
जोगींदरो देवी, (80 वर्षे)
खालावलेल्या तब्येतीवर कठुआ येतील हॉस्पिटलात उपचार घेत असलेल्या जोगींदरो देवींनी मतदानाच्या दिवशी अक्षरशः व्हीलचेअर वर बसून मतदान केंद्राकडे धाव घेतली. जम्मू काश्मीर येथील कठुआ मतदान केंद्रावर मत देऊन त्या पुन्हा हॉस्पिटल मध्ये उपचारांसाठी दाखल झाल्या.
उषा आणि उर्मिला (90 वर्षे)
बिहार राज्यातील 39व्या मतदान केंद्र भागलपूर येथे उषा आणि उर्मिला या 90 वर्षीय महिलांनी मतदान केले. यापैकी एका महिलेला चालत येत नसल्याने केंद्रा बाहेरील एका सुरक्षा जवानाने तिला उचलून मतदार केंद्रावर आणले होते.
बिहारमधील किशनगंज, काठियार, भागलपूर, पूर्णिया, बंका या जिल्ह्यांमध्ये मतदान सुरळीत पार पडले.
ज्येष्ठ जोडप्याचे मतदान
कर्नाटक मधील बेंगलोर दक्षिण संसदीय मतदारसंघातील जयनगर केंद्रावर 91 वर्षीय श्रीनिवास व 84वर्षीय मंजुला या जोडप्याने मतदानासाठी हजेरी लावली.
दक्षिण कर्नाटकातील 14 मतदार संघातून मतदान घेण्यात आले होते.
या सोबतच देशातील सर्वात जुने व पहिले मतदार श्याम सरन नेगी (102 वर्षे) यंदा हिमाचल प्रदेशात होणाऱ्या सातव्या टप्प्यातील निवडणुकीत 19 मे ला मतदान करणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार यंदा लोकसभा 2019 निवडणूक सात टप्प्यात घेतली जाणार असून शेवटच्या टप्प्यात 19 मे रोजी मतदान पार पडणार आहे. यांनतर 23 मे ला निकाल घोषित होणार आहे.