प्रचार संपला, एकही उत्तर न देता पत्रकार परिषद आटोपली, आता नरेंद्र मोदी केदारनाथच्या चरणी लीन, केली ध्यान धारणा
त्यानंतर पंतप्रधान बद्रिनाथाचेही दर्शन घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) शेवटच्या टप्प्यातील मतदान उद्या, 19 मे रोजी पार पडणार आहे, काल सर्व पक्षांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. कालची संध्याकाळ भारतीय जनतेसाठी खास ठरली, कारण सत्तेवर आल्याबर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली. मात्र या परिषदेमध्ये त्यांनी एकाही प्रश्नांचे उत्तर दिले नाही, असो. आज आपल्या विजयाचे साकडे घालण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी केदारनाथचे (Kedarnath) दर्शन घेतले, इथे त्यांनी विशेष पूजाही केली. त्यानंतर पंतप्रधान बद्रिनाथाचेही दर्शन घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी साधारण 9 वाजता डोक्यावर टोपी, हातात काठी व गढवाली पोशाखात आपल्या सुरक्षा रक्षकांच्या राफ्यासह केदारनाथाच्या मंदिरात प्रवेश केला. रुद्राक्षांची माळ, चंदनाचा टिळा लावून पंतप्रधानांनी इथे साधना केली, प्रदक्षिणा घातली. मोदींचा गेल्या पाच वर्षांमधला हा चौथा केदारनाथ दौरा आहे. उद्या ते बद्रीनाथचे दर्शन घेणार आहेत. (हेही वाचा: 'पाच वर्षात सरकारने भरीव काम केले', सत्ताकाळातील अखेरच्या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिलीच पत्रकार परिषद)
नरेंद्र मोदी येणार म्हणून सुरक्षा यंत्रणेने मंदिर परिसर ताब्यात घेऊन काही तासांसाठी मंदिर दर्शन बंद ठेवण्यात आले होते. या दौऱ्यात त्यांनी केदारनाथच्या विकासाचा आढावा घेतला. आजचा मुक्काम ते केदारनाथ इथेच करणार आहेत. दरम्यान उद्या लोकसभा निवडणुका पूर्णतः पार पडणार असून, 23 मे रोजी निकाल लागणार आहे.