Covid-19 In India: चीनसह 'या' पाच देशांतील प्रवाशांची करण्यात येणार RT-PCR चाचणी; संक्रमित आढळल्यास राहावे लागणार क्वारंटाईन

चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विमान वाहतूक मंत्रालयाचा आदेश जारी करण्यात आला आहे.

COVID-19 | (Photo Credits: ANI)

Covid-19 In India: जगभरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Min Dr Mandaviya) यांनी सांगितले की, चीन, जपान, हाँगकाँग, बँकॉक आणि दक्षिण कोरियामधून भारतात येणाऱ्या लोकांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य असेल. याबाबत लवकरच सविस्तर आदेश काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मांडविया म्हणाले, आम्ही या मुद्द्यावर विमान वाहतूक मंत्रालयाशी बोलत आहोत. ज्या प्रवाशांचा RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल किंवा ज्यांना तापासारखी लक्षणे आढळतील त्यांना क्वारंटाईन केले जाईल. गर्दीच्या ठिकाणी लोकांना मास्क घालण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्यासारख्या पद्धतींचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत आरोग्य मंत्र्यांना जगातील कोरोना संसर्गाची ताजी परिस्थिती तसेच देशातील परिस्थितीची माहिती देण्यात आली. (हेही वाचा -Covid-19 BF.7 Variant in India: भारतात BF.7 व्हेरियंटचे 4 रुग्ण; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बोलावली राज्याच्या आरोग्य मंत्र्याची बैठक)

हवाई सुविधा फॉर्म भरणे बंधनकारक -

चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विमान वाहतूक मंत्रालयाचा आदेश जारी करण्यात आला आहे. याअंतर्गत सध्याची आरोग्य स्थिती जाहीर करण्यासाठी हवाई सुविधा फॉर्म भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जगातील कोरोनाची नवी लाट पाहता मंगळवारी देशातील सर्व कोरोना रुग्णालये आणि संबंधित युनिट्समध्ये मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. मॉक ड्रिलचा उद्देश कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या सर्व उपकरणांसह इतर सुविधांच्या सज्जतेची चाचणी करणे हा आहे. गेल्या वर्षीपर्यंत उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधा पहिल्या दिवसापासून पूर्ण क्षमतेने काम करण्यास तयार आहेत की नाही हे पाहिले जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.