Covid-19: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, तामिळनाडुसह 'या' राज्यांनी घातली 'New Year Celebration'वर बंदी

कोरोना संसर्गामुळे विविध राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

प्रतीकात्मक तस्वीर (Photo Credits: Pixabay)

New Year Celebration: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार (New Coronavirus Strain) आढळून आल्याने जगभरात भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भारतासह अनेक देशांनी ब्रिटनहून येणारी विमाने बंद केली आहेत. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांत निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोना संसर्गामुळे विविध राज्यात नाईट कर्फ्यू (Night Curfew) लागू करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर विरजण पडण्याची शक्तता आहे. नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेक राज्यांनी नवीन वर्षाच्या सामूहिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे.

दरम्यान, देशात कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी, कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान कोरोना विषाणूचा धोका आणखी वाढू नये, म्हणून अनेक राज्यांनी नवीन वर्षानिमित्त आयोजित केलेल्या सामूहिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे. (हेही वाचा - New Coronavirus Strain: नव्या कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली 'No Corona, Corona No' ची घोषणा)

महाराष्ट्र:

राज्य सरकारने सर्व शहरे व महानगरपालिका क्षेत्रात सात तास नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे. सरकारने 22 डिसेंबरपासून रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 या वेळेत कर्फ्यू लागू केला आहे. हा नाईट कर्फ्यू 5 जानेवारी 2021 पर्यंत लागू असणार आहे. याशिवाय नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अधिक दक्षता घेत आहे.

तामिळनाडू:

राज्य सरकारने 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी 2021 रोजी नवीन वर्षाच्या उत्सवावर समुद्रकिनारे, हॉटेल, क्लब आणि रिसॉर्ट्सवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे या दिवसांत समुद्रकिनार्‍यावर कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही तसेच मध्यरात्री कोणत्याही पार्टीचे आयोजन होणार नाही. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी दरम्यान कोणत्याही प्रकारच्या रेस्टॉरंट्स, क्लब, रिसॉर्ट्स, पब, बीच रिसॉर्ट्स, बीचवरील कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे.

राजस्थानः

31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान संध्याकाळी 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत राजस्थानमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्षाची पार्टी होणार नाही.

कर्नाटक:

राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला नाही. परंतु, 30 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत रेस्टॉरंट्स, क्लब आणि पब यासारख्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमा होण्यास बंदी घालण्यात आली आहे. या काळात क्लब, रेस्टॉरंट्स आणि पबमध्ये कोणत्याही पार्टीचे आयोजन केले जाऊ शकत नाही. मात्र, कोविड नियमांचे पालन करून ही ठिकाणे खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

उत्तराखंड:

राज्याची राजधानी देहरादूनमध्ये हॉटेल, बार, रेस्टॉरंट्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्षाच्या कार्यक्रमांवर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी बंदी घालण्यात आली आहे. देहरादून, मसूरी आणि ऋशिकेश येथे ही बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी नवीन वर्षानिमित्त मोठ्या संख्येने लोक गर्दी करत असतात.