NV Ramana असतील देशाचे पुढचे सरन्यायाधीश; CJI एस ए बोबडे यांनी सरकारकडे पाठविली शिफारस

बोबडे 23 एप्रिल रोजी आपल्या पदावरून निवृत्त होणार आहेत. यानंतर एनव्ही रमन्ना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत.

N. V. Ramana (PC - PTI)

Chief Justice of India: सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती एन.व्ही. रमन्ना (N V Ramana) हे देशाचे पुढील मुख्य सरन्यायाधीश (Chief Justice of India) असतील. विद्यमान सरन्यायाधीश एस.ए. बोबडे (SA Bobde) यांनी त्यांच्या नावाची शिफारस सरकारकडे पाठविली आहे. अलीकडेच, सरकारने त्यांना उत्तराधिकारी म्हणून नाव पाठविण्यास सांगितले होते. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे 23 एप्रिल रोजी आपल्या पदावरून निवृत्त होणार आहेत. यानंतर एनव्ही रमन्ना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत.

न्यायमूर्ती रमन्ना यांचा कार्यकाळ मुख्य सरन्यायाधीश म्हणून एक वर्ष आणि चार महिने असा असणार आहे. ते रमन्ना हे आंध्र प्रदेशातील एका शेतकरी कुटुंबातील आहेत. जून 2000 मध्ये एपी हायकोर्टाने त्यांची स्थायी न्यायाधीश म्हणून नेमणूक केली होती. फेब्रुवारी 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी ते दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. (वाचा - सरन्यायाधीश शरद बोबडे या मराठी माणसाच्या आयुष्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?)

जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट निर्बंधावर न्यायमूर्ती रमन्ना यांच्या खंडपीठाने इंटरनेटवरील निर्बंध त्वरीत हटवावेत, असा निर्णय दिला होता. त्यानंतर सरकारने बंदी उठवली होती. न्यायमूर्ती रमन्ना हे पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात होते, ज्यांनी सीजेआय कार्यालय आरटीआय अंतर्गत येईल, असं म्हटलं होतं.

ही शिफारस करण्यापूर्वी सीजेआय बोबडे यांनी न्यायमूर्ती रमन्ना यांच्या विरोधात आंध्र प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री वाय.एस. जगमोहन रेड्डी यांनी केलेली तक्रार फेटाळली. आता ही तक्रार फेटाळून लावल्यानंतर आणि शिफारसपत्र सरकारकडे गेल्यानंतर न्यायाधीश रमन्ना यांना देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख म्हणून नेमण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.