लवकरच बंद होणार Work From Home; देशातील TCS, Wipro, Infosys सारख्या IT कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलवायला सुरुवात केली

यामुळे टीसीएसच्या सीईओने सूचित केले आहे की आता कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावले जाऊ शकते. कोरोनाची तिसरी लाट पाहता 70-80 टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावले जाऊ शकते.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pexels)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव आणि संसर्ग अजूनही जगात वाढत आहे. भारतात अजूनही नवीन कोरोना पॉझिटिव्ह केसेस समोर येत आहेत. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत सध्या रुग्ण संख्येत घट झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि आपल्या कर्मचाऱ्यांना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी, बहुतेक कंपन्यांनी गेल्या एक वर्षाहून अधिक काळापासून घरून काम करण्याची (Work From Home) मुभा दिली आहे. आता सर्वत्र कोरोना लसीकरणाचा वेग वाढत असताना, आयटी कंपन्यांनी (IT Company) कर्मचाऱ्यांना घरून काम करू देणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक आयटी कंपन्या आता कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावत आहेत. यातील मधला मार्ग म्हणून, काही कंपन्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात येऊन काम करण्यास सांगत आहेत. देशातील मोठ्या आयटी कंपन्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), विप्रो (Wipro) आणि Apple कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यास सुरुवात केली आहे.

विप्रोने म्हटले आहे की सुमारे 18 महिन्यांनंतर त्यांचे कर्मचारी सोमवार, 13 सप्टेंबर 2021 पासून कार्यालयात येऊ लागले आहेत. पूर्णपणे लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोनदा कार्यालयात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचवेळी, टीसीएसने म्हटले आहे की, त्यांच्या 50 लाख कर्मचाऱ्यांपैकी 70-80 टक्के कर्मचारी 2021 च्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला कार्यालयात येण्याची तयारी करत आहेत. टीसीएस आपल्या 80 टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्याची तयारी करत आहे. (हेही वाचा: Farmers' Agitation: शेतकरी आंदोलनामुळे तब्बल 9000 कंपन्यांचे नुकसान; NHRC ने दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेशला पाठवली नोटीस)

कंपनीने म्हटले आहे की, त्यांच्या 90 टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे टीसीएसच्या सीईओने सूचित केले आहे की आता कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावले जाऊ शकते. कोरोनाची तिसरी लाट पाहता 70-80 टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावले जाऊ शकते. त्याचबरोबर देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसदेखील आता आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवण्याची तयारी करत आहे. कंपनी आपल्या 2.6 लाख कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावू शकते.