Woman's Right to Work: पत्नीला नोकरी सोडण्यास भाग पाडणे म्हणजे 'क्रूरता'; उच्च न्यायालयाने दिली घटस्फोटाला मंजुरी
तिने आरोप केला होता की, तिचा नवरा तिला नोकरी सोडून भोपाळमध्ये राहण्यासाठी मानसिक त्रास देत आहे.
Woman's Right to Work: अनेकवेळा विवाहित महिलांना अनेक कारणास्तव नोकरी सोडण्यास भाग पाडले जाते. अशी बरीच प्रकरणे समोर आली आहेत. आता, पत्नीला नोकरी सोडून पतीच्या इच्छेनुसार जगण्यास भाग पाडणे ही बाब क्रूरतेच्या श्रेणीत येते, असे न्यायालयाने म्हटले आहे. या युक्तिवादाच्या आधारे उच्च न्यायालयाने पत्नीला घटस्फोट घेण्यास परवानगी दिली. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी यांच्या खंडपीठाने कायदेशीर बाबींचा विचार करून कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द केला.
अहवालानुसार, इंदूरमधील एका सरकारी विभागात व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेने तिच्या पतीविरोधात कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. तिने आरोप केला होता की, तिचा नवरा तिला नोकरी सोडून भोपाळमध्ये राहण्यासाठी मानसिक त्रास देत आहे. कोर्टाने महिलेचा हा अर्ज फेटाळला. त्यानंतर पीडित महिलेने कौटुंबिक न्यायालयाच्या या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.
उच्च न्यायालयात 13 नोव्हेंबर रोजी दिलेल्या निकालात सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने म्हटले, पती-पत्नीला एकत्र राहायचे आहे की नाही, ही त्यांची इच्छा आहे. जोडीदारांपैकी कोणीही दुसऱ्या पक्षाला आपल्या आवडीनुसार नोकरी न करण्याची किंवा नोकरी करण्यास भाग पाडू शकत नाही. उच्च न्यायालयाने सांगितले की, सध्याच्या प्रकरणात पतीने पत्नीवर सरकारी नोकरी सोडण्यासाठी दबाव टाकला. पत्नीला तिची नोकरी सोडून पतीच्या इच्छेनुसार आणि मार्गानुसार जगण्यास भाग पाडणे हे क्रूरतेच्या श्रेणीत येते. (हेही वाचा: घटस्फोटानंतर आईसोबत राहत असलेल्या मुलींना सांभाळण्यासाठी, उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी वडील कायदेशीररित्या बांधील; Karnataka High Court चा महत्वाचा निर्णय)
महिलेचे वकील राघवेंद्र सिंह रघुवंशी यांनी शुक्रवारी पीटीआयला सांगितले की, याचिकाकर्ती महिला लग्नानंतर, पतीसोबत भोपाळमध्ये राहून सरकारी भरती परीक्षांची तयारी करत होती. 2017 मध्ये महिलेला सरकारी उपक्रमात नोकरी मिळाली, पण तिच्या पतीला रोजगार मिळत नसल्याने त्याचा अहंकार दुखावू लागला. त्यानंतर पतीने आपल्या पत्नीचा छळ करण्यास सुरुवात केली आहे आणि तिच्यावर सरकारी नोकरी सोडून भोपाळमध्ये राहण्यासाठी तिच्यावर दबाव आणू लागला. पत्नी पतीच्या या मागणीसाठी तयार नसल्यामुळे या जोडप्यात मतभेद वाढू लागले. पतीच्या मानसिक छळाला कंटाळून महिलेने अखेर घटस्फोटाचा निर्णय घेतला.