विप्रो कंपनी प्रमुख अजीम प्रेमजी घेणार निवृत्ती; 53 वर्षांच्या प्रवासाची समाप्ती; भारतातील दानशूर व्यक्ती म्हणून सर्वपरिचित
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये ते 36 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची प्राप्त माहितीनुसार संपत्ती 22.2 अरब डॉलर (भारतीय रुपयांत 1.55 लाख कोटी रुपये) इतकी आहे. प्रेमजी हे आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून दानधर्मही करतात. आतापर्यंत त्यांना दानधर्माच्या माध्यमातून 1.45 कोटी रुपये दिले आहेत.
देशाच्या आयटी इंडस्ट्रीमंध्ये अग्रक्रमांकावर असलेल्या विप्रो (Wipro) कंपनीचे एक्झिक्युटीव्ह चेअरमन अजीम प्रेमजी (Azim Premji) वयाच्या 73 व्या वर्षी येत्या 30 जुलैपासून सेवानिवृत्ती घेत आहेत. या पूढे ते कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मंडळात नॉन-एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर आणि फाऊंडर चेअरमन या भूमिकेत दिसतील. दरम्यान, विप्रोने माहिती देताना गुरुवारी सांगितले की, अजीम प्रेमजी यांच्या निवृत्तीनंतर त्यांचा मुलगा रिशद प्रेमजी (Rishad Premji) हे कंपनीचे एक्झिक्युटीव्ह चेअरमन म्हणून धुरा सांभाळणार आहेत. रिशद प्रेमजी हे सध्या कंपनीच्या चीफ स्ट्रॅटिजी ऑफिसर (सीएसओ) पदावर कार्यरत आहेत. तसेच, ते कंपनीच्या प्रमुख मंडळाचेही सभासद आहेत.
दरम्यान, गेली 53 वर्षे अजीम प्रेमजी विप्रो कंपनीचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी 1966 मध्ये विप्रो कंपनीची धुरा खांद्यावर घेतली. वडीलांचे अचानक निधन झाल्यामुळे अजीम प्रेमजी यांना विप्रोची सूत्रे स्वीकारावी लागली. त्यांनी विप्रोची धुरा सांभाळली तेव्हा ते स्टॅनफोर्ड विद्यापिठात शिक्षण घेत होते. ते शिक्षण अर्धवट सोडून त्यांना कंपनीचे नेतृत्व करावे लागले. कंपनीची नेतृत्व अजीम यांच्या हाती आले तेव्हा, विप्रो कुकिंग ऑईल व्यवसायात होती. 1982 मध्ये कंपनीने आयटी क्षेत्रात पदार्पण केले.
अजीम प्रेमजी यांचे चिरंजीव रिशद प्रेमजी (वय 41) यापूडे कंपनीचे नेतृत्व करतील. दरम्यान, विप्रोने माहिती देताना सांगितले की, कंपनीचे सीईओ आणि एक्जीक्यूटिव डायरेक्टर आबिद अली नीमचवाला यांचे पद आता सीईओ आणि एमडी असे राहणार आहे. हा बदल भागधारकांनी मान्यता दिल्यानंतर येत्या 31 जुलैपासून होणार आहे.
दरम्यान, रशद हे 2007 पासून विप्रोशी जोडले गेले आहेत. ते कंपनीच्या बँकींग अॅण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस डव्हीजनमध्ये बिजनेस मॅनेजर होते. रिशद हे हावर्ड बिजनेस स्कूल येथून एमबीए झाले आहेत. विप्रोमध्ये येण्यापूर्वी दोन वर्ष ते लडन येथील बेन अॅण्ड कंपनीमध्ये कन्सल्टंट होते. काही काळ त्यांनी अमेरिकन कंपनी जीई कॅपीटल फर्मसोबतही काम करत होते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, विप्रोमध्ये त्यांची भरतीही एखाद्या सर्वसामान्य कर्मचाऱ्याप्रमाणेच झाली होती. (हेही वाचा, L&T चे निवृत्त चेअरमन Anil Naik यांचा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान; संपूर्ण करिअरमध्ये एकही सुट्टी न घेता कमावले तब्बल 20 कोटी रुपये)
ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सने दिलेल्या वृत्तानुसार, अजीम प्रेमजी हे जगातील सर्वात श्रीमंत अशा व्यक्तींपैकी एक आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये ते 36 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची प्राप्त माहितीनुसार संपत्ती 22.2 अरब डॉलर (भारतीय रुपयांत 1.55 लाख कोटी रुपये) इतकी आहे. प्रेमजी हे आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून दानधर्मही करतात. आतापर्यंत त्यांना दानधर्माच्या माध्यमातून 1.45 कोटी रुपये दिले आहेत. आजीम प्रेमजी यांच्या दानधर्माच्या गुणाची मायक्रोसॉफ्टचे को-फाऊंडर आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बिल गेट्स यांनीही त्यांचे कौतुक केले आहे.