What is Analogue Paneer: ॲनालॉग पनीर म्हणजे काय? बनावट पनीरचा खेळ, नियम आणि आरोग्यावरील परिणाम
ॲनालॉगपनीर म्हणजे काय, ते कसे तयार केले जाते आणि अस्सल पनीरपेक्षा ते किती वेगळे असते? अन्न सुरक्षेच्या दृष्टीने याविषयी जाणून घ्या सविस्तर बातमी.
बाजारात पनीरच्या नावाखाली विकले जाणारे 'ॲनालॉग पनीर' सध्या मोठ्या चर्चेत आले आहे. अन्न सुरक्षा यंत्रणांनी बनावट आणि कृत्रिम दुग्धजन्य पदार्थांवर राज्यभरात कडक कारवाई सुरू केल्याने या विषयाचे गांभीर्य वाढले आहे. दिसायला आणि चवीला हुबेहूब अस्सल पनीरसारखे दिसणारे हे 'अॅनालॉग पनीर' नेमके काय आहे आणि ते आरोग्यासाठी किती सुरक्षित आहे, हे जाणून घेणे सर्वसामान्य ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
ॲनालॉग पनीर म्हणजे काय?
ॲनालॉग पनीर (Analogue Paneer) हा अस्सल दुधापासून बनवलेल्या पनीरचा एक कृत्रिम किंवा बिगर-दुग्धजन्य पर्याय आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) व्याख्येनुसार, जेव्हा पनीरमधील दुधाची नैसर्गिक स्निग्धता (Milk Fat) पूर्णपणे किंवा काही प्रमाणात काढून त्याऐवजी वनस्पती तेल किंवा इतर घटकांचा वापर केला जातो, तेव्हा त्याला 'अॅनालॉग' म्हटले जाते.
हे बनावट पनीर तयार करण्यासाठी मुख्यत्वे पाम तेल, स्टार्च, दुधाची पावडर (Skimmed Milk Powder) आणि इमल्सीफायर्सचा वापर केला जातो. या घटकांमुळे त्याचा रंग, मऊपणा आणि पोत (Texture) अगदी खऱ्या दुधाच्या पनीरसारखाच तयार होतो.
🚨Analogue Paneer Banned In Maharashtra For 1 Year; Tukaram Mundhe Says Production, Transport, Storage, Sale Prohibited
Video by @NirmeetiP#FDA #AnaloguePaneer #foodsafety #TukaramMundhe pic.twitter.com/xV4mEPL8qs
— Free Press Journal (@fpjindia) August 5, 2026
अस्सल पनीर आणि ॲनालॉग पनीरमधील फरक
अस्सल पनीर हे शुद्ध दुधापासून बनवले जाते आणि त्यात प्रथिने (Proteins) व कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. याउलट, अॅनालॉग पनीरमध्ये दुधातील पोषक घटकांऐवजी स्वस्त वनस्पती चरबीचा (Vegetable Fat) वापर होतो.
उत्पादन खर्चात मोठी बचत होत असल्याने अनेक व्यावसायिक, हॉटेल्स आणि कॅटरर्सकडून या पनीरचा वापर वाढला आहे. अस्सल पनीरच्या तुलनेत अॅनालॉग पनीर बनवण्याचा खर्च निम्म्याहून कमी असतो, ज्यामुळे बाजारात अधिक नफा मिळवण्यासाठी याचा गैरवापर केला जातो.
कायदेशीर नियम आणि ग्राहकांची फसवणूक
अन्न सुरक्षा नियमांनुसार, नियमांचे पालन करून बनवलेले अॅनालॉग पनीर विकणे बेकायदेशीर नाही. मात्र, पॅकेटवर किंवा विक्रीच्या ठिकाणी ते 'अॅनालॉग' किंवा 'बिगर-दुग्धजन्य' असल्याचे स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक आहे.
अनेक व्यापारी आणि उपहारगृहे अॅनालॉग पनीरला अस्सल दुधाचे पनीर म्हणून ग्राहकांना वाढतात, जी थेट ग्राहकांची फसवणूक मानली जाते. अशा प्रकारे लेबलशिवाय किंवा फसवणूक करून पनीर विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) कठोर दंडात्मक कारवाई आणि तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे.
ॲनालॉग किंवा बनावट पनीर कसे ओळखावे?
हाताने मळणे: अस्सल पनीर मऊ आणि लवचिक असते. अॅनालॉग पनीर हातावर घेऊन चोळल्यास ते लगेच बारीक होऊन त्याचे तुकडे पडतात.
आयोडीन चाचणी: पनीर पाण्यात उकळून थंड झाल्यावर त्यावर आयोडीनचे काही थेंब टाकल्यास त्याचा रंग निळा झाला, तर त्यात स्टार्च (अॅनालॉग घटक) असल्याचे सिद्ध होते.
लेबल तपासणे: पॅकबंद पनीर खरेदी करताना घटकांची यादी (Ingredients) आवर्जून तपासावी. त्यावर 'Analogue' किंवा 'Non-Dairy Fat' असा उल्लेख असल्यास ते अस्सल पनीर नाही.
ग्राहकांनी स्वस्त दराला बळी न पडता अधिकृत आणि नोंदणीकृत विक्रेत्यांकडूनच दुग्धजन्य पदार्थांची खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 06, 2026 07:21 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

