West Bengal Shocker: मालदा येथे तिसऱ्यांदा मुलीला जन्म दिला म्हणून महिलेच्या हत्येचा प्रयत्न; पतीने जबरदस्तीने पाजले कीटकनाशक

आरोपीने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. त्याने आरोप केला की त्याच्या पत्नीचे स्थानिक नागरी स्वयंसेवकांपैकी एकाशी विवाहबाह्य संबंध होते व यामुळेच त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती.

Crime | (File image)

पश्चिम बंगालमधील (West Bengal) मालदा (Malda) जिल्ह्यात सलग तिसऱ्या वेळेस मुलीला जन्म दिला म्हणून एका महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न झाला आहे. महिलेने तिसऱ्यांदा मुलीला जन्म दिल्याने तिच्या पतीने तिला जबरदस्तीने कीटकनाशक पाजल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक पोलीस सूत्रांनी सांगितले की, पत्नीला कीटकनाशक खाऊ घालल्यानंतर पतीने जन्मलेल्या मुलीलाही कीटकनाशक पाजण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी इतर दोन मुली तिथून कसे तरी पळून जाण्यात यशस्वी झाल्या आणि त्यांनी त्यांच्या आजी-आजोबांना म्हणजेच महिलेच्या आई-वडिलांना घडला प्रकार सांगितला. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली.

त्यानंतर महिलेच्या वडिलांनी स्थानिक लोकांच्या मदतीने आपल्या मुलीची आणि जन्मलेल्या नातीची सुटका केली. त्यानंतर दोघींना स्थानिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने आई आणि तिच्या मुलीला मालदा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर महिलेच्या वडिलांनी आपल्या जावयाच्या विरोधात आपली मुलगी आणि नातीच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ते म्हणाले, ‘माझ्या मुलीला तिने मुलींना जन्म दिल्याबद्दल जावयाकडून अनेकदा मारहाण केली जात असे. आता त्याने त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने माझ्या इतर दोन नातींनी आम्हाला वेळेत माहिती दिली व आम्ही दोघींना वाचवू शकलो.’ (हेही वाचा: Jharkhand: गर्लफ्रेंडने ब्लेडने कापला प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट; पीडित तरुणाची प्रकृती चिंताजनक)

याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आरोपीने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. त्याने आरोप केला की त्याच्या पत्नीचे स्थानिक नागरी स्वयंसेवकांपैकी एकाशी विवाहबाह्य संबंध होते व यामुळेच त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. या भांडणातच त्याच्या पत्नीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.